पसरणीच्या दऱ्याखोऱ्यातला आवाज महाराष्ट्रात घुमला
By Admin | Updated: March 21, 2015 00:13 IST2015-03-20T23:47:52+5:302015-03-21T00:13:09+5:30
साताऱ्याचे साबळे : आईच्या ओव्या, वडिलांच्या भजनावर पोसला शाहिरी पिंड

पसरणीच्या दऱ्याखोऱ्यातला आवाज महाराष्ट्रात घुमला
राजीव मुळये - सातारा -‘भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,’ असे आरोळी देत मऱ्हाटी माणसाच्या कर्तृत्वाला साद घालणारे महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे यांचा पिंड आईकडून ऐकलेल्या जात्यावरील ओव्या आणि वडिलांकडून ऐकलेल्या भजनांवर पोसला. पसरणीच्या दरीखोऱ्यात घुमलेल्या या खड्या आवाजाचा प्रतिध्वनी हा महाराष्ट्राचा श्वास बनला.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कृष्णरावांना अंमळनेर या त्यांच्या आजोळी लहानपण व्यतीत करावे लागले, तेव्हाच त्यांच्या जीवनात मोठी उलथापालथ सुरू होती. एकीकडे परिस्थिती चटके देत होती, तर दुसरीकडे ‘उत्तम गाणारा तुझा नातू मला दे,’ अशी मागणी साक्षात गाडगेबाबा त्यांच्या आजीला करीत होते. सातवीची परीक्षा न देताच त्यांना पसरणीला परतावे लागले. अंगी असलेल्या कलागुणांचा वापर करून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
फलटण येथील त्यांच्या कार्यक्रमाने प्रभावित होऊन वकील बारसोडे यांची मुलगी भानुमती शाहिरांच्या प्रेमात पडली. १८ फेब्रुवारी १९४९ रोजी दोघांचा पसरणीत झालेला आंतरजातीय विवाह ही मोठी क्रांतिकारी घटना होती. सूनमुख प्रथम पाहणाऱ्या कृष्णरावांच्या वडिलांनी आपल्याकडील ज्ञानेश्वरी सुनेला भेट दिली.
‘चले जाव’ आंदोलन सुरू असताना गांधीजींचे मुंबईत झालेले भाषण, क्रांतिसिंह नाना पाटील यांची झालेली भेट, साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्याने शाहीर साबळे यांचा वैचारिक पिंड घडला. तात्या टोपे, हुतात्मा बाबू गेनू, नाना पाटील, कर्मवीर यांचे पोवाडे शाहिरांनी लिहिले. याखेरीज निवडणुकीचा पोवाडाही त्यांनी लिहिला. या राजकीय पोवाड्यांबरोबरच चिनी आक्रमणावरील पोवाडा, कोयनेचा पोवाडा हे त्यांचे अन्य प्रसिद्ध पोवाडे होत. १९४५ ते १९७५ हा शाहीर साबळे यांच्या दृष्टीने सर्वाधिक निर्मितीक्षम कालखंड ठरला.
इंद्राच्या दरबारात तमासगीर (१९४५), नारदाचा रिपोर्ट (१९५१), चित्रगुप्ताच्या दरबारात दारुड्या (१९५२), कोड्याची करामत (१९५३), कोयना स्वयंवर (१९५४), नशीब फुटके सांधून घ्या (१९५५), यमाच्या राज्यात एक रात्र (१९६०) ग्यानबाची मेख (१९६२), मीच तो बादशहा (१९६३), आबुरावचे लगीन (१९६३), आंधळं दळतंय (१९६७), असुनी खास मालक घरचा (१९६८), बापाचा बाप (१९७२), कशी काय वाट चुकला (१९७३) ही त्यांची गाजलेली मुक्तनाट्ये आणि वगनाट्ये होत. त्यांच्या नाट्यामधून कधी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, कधी शोषणाविरुद्ध आवाज, कधी दैववादावर प्रहार तर कधी रिकामटेकडेपणावर मार्मिक भाष्य आढळून येते.
महाराष्ट्रगीत प्रथम घुमले सोलापुरात
शाहीर साबळे यांना ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकरांचीही शाबासकी लाभली. शाहीर सिद्धराम बसाप्पा मुचाटे, शाहीर शंकरराव निकम यांच्या कवनांनी साबळे यांना भुरळ घातली होती. शनिवार वाड्यावर शाहीर निकमांचा कार्यक्रम सुरू असताना ‘स्वराज्य दारी आले, आणा दीपक ज्योती’ हे गाणे म्हणण्याची संधी साबळे यांना मिळाली आणि तेथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत सोलापूरला झालेल्या शेतकरी मेळाव्यात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत शाहिरांच्या मुखातून प्रथम बाहेर पडले आणि ते ‘महाराष्ट्र शाहीर’ झाले.
पडेल ते काम केले
‘शाहीर साबळे आणि पार्टी’ निर्माण होऊन पहिला कार्यक्रम सादर होताच त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. परंतु शाहिरांना प्रसिद्धीच्या झोतात येण्यास बराच कालखंड जावा लागला. तोपर्यंत कलेवर मनापासून
प्रेम करत शाहिरांनी पडेल ते काम केले. मुंबईच्या स्वदेशी मिलमध्ये त्यांनी कामगार म्हणून काम केले.
सरस्वती सिनेटोन या स्टुडिओत या मनस्वी
कलावंतावर ‘वाद्यांची देखभाल’ हे काम
सोपविण्यात आले होते.