Vital phase of coronavirus begins next 15 days are crucial says CM uddhav thackeray kkg | CoronaVirus: कोरोना गुणाकार करण्याची शक्यता, पुढील १५ दिवस महत्त्वाचे- मुख्यमंत्री

CoronaVirus: कोरोना गुणाकार करण्याची शक्यता, पुढील १५ दिवस महत्त्वाचे- मुख्यमंत्री

मुंबई: कोरोनाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घरीच राहा, अनावश्यक गर्दी टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय अतिशय धाडसी आहे. मात्र तुमच्यावर विश्वास ठेऊन मी हा निर्णय घेतला आहे, असंदेखील मुख्यमंत्री म्हणाले. 

कोरोनाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून येत्या काही दिवसांत कोरोना गुणाकार करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपण अन्नधान्याची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तुमच्यावर विश्वास दाखवून घेतला आहे. गर्दी टाळण्याच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे कृपया दुकानांमध्ये गर्दी करू नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं.


 
परराज्यातून आलेले काही जण त्यांच्या गावाला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहतूक बंद असल्यानं ते जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. परराज्यातून आलेल्यांनी धोकादायक प्रवास करू नये. त्यांनी इथंच थांबावं. राज्य सरकार त्यांची काळजी घेईल. कारण हीच आपली संस्कृती आहे. माणूस जगवायचा आहे. त्यासाठी माणुसकी जपायलाच हवी, असंदेखील मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाची लक्षणं दिसल्यास तातडीनं रुग्णालयात जा. वेळेवर उपचार घेतल्यास कोरोना बरा होतो. कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक जण ठणठणीत बरे झाले असून त्यांच्या घरी परतले आहेत. त्यामुळे चिंता करू नका, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. कोरोनाचा विषाणू तुमच्या घराबाहेर आहे. तुमच्या घरात नाही. त्यामुळे तुम्ही घरात सुरक्षित आहात. घराबाहेर पडू नका. परिस्थिती आव्हानात्मक आहे. तुम्ही सकारात्मक राहा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Vital phase of coronavirus begins next 15 days are crucial says CM uddhav thackeray kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.