Virar Hospital Fire: 'In the current situation, there is stress on government agencies, it is accepted but ...' - Raj Thackeray | Virar Hospital Fire : 'सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण...' - राज ठाकरे

Virar Hospital Fire : 'सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण...' - राज ठाकरे

ठळक मुद्देया आगीच्या दुर्घटनेप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत.

मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असे नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचे तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवे आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. 

दुसरीकडे, या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत. आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

याचबरोबर, आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

(Virar Hospital Fire Live Updates : विरारमधील कोविड सेंटरला आग, 13 रुग्णांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा)

दरम्यान, नाशिकमधील एका रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा पाइप फुटून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. ही घटना ताजी असताना आता विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली.  या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीनंतर रुग्णालयातील अन्य रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे.

(Virar Hospital Fire : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर)

ही घटना अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक - उपमुख्यमंत्री अजित पवार
"विरारच्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत होरपळून रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले; ही घटना अतिशय दुर्दैवी, क्लेशदायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!  मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल मी सहसंवेदना व्यक्त करतो. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून त्यात रुग्ण मृत्युमुखी पडणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य रुग्णांची सुरक्षितता व त्यांच्यावरील उपचार सुरळीत सुरु राहतील,याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.रुग्णालयांची सुरक्षितता,फायर ऑडीट करण्याचे निर्देश देऊनही अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात आणि देशात अशा घटना वाढल्या आहेत. यामागची कारणे उच्चस्तरीय समितीकडून शोधून त्रूटी कायमस्वरुपी दूर करण्याची बाब गांभीर्यानं घेतली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यातून तथ्य बाहेर येईल, असा मला विश्वास आहे", असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Virar Hospital Fire: 'In the current situation, there is stress on government agencies, it is accepted but ...' - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.