विरार-अलिबाग मार्गामुळे महामुंबईला विकासवळण; 'एमएमसी' बदलणार एमएमआरचा चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 09:27 IST2026-03-09T09:26:53+5:302026-03-09T09:27:54+5:30
मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलणारा आणि अवजड वाहतुकीला शहराबाहेरून नवा रस्ता देणारा 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय द्रुतगती महामार्ग' (मल्टी मोडल कॉरिडॉर - एमएमसी) आकाराला येत आहे.

विरार-अलिबाग मार्गामुळे महामुंबईला विकासवळण; 'एमएमसी' बदलणार एमएमआरचा चेहरा
अनिलकुमार गायकवाड
व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई
मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलणारा आणि अवजड वाहतुकीला शहराबाहेरून नवा रस्ता देणारा 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय द्रुतगती महामार्ग' (मल्टी मोडल कॉरिडॉर - एमएमसी) आकाराला येत आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या ३९ हजार ६१३ कोटींच्या या प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०२६ पासून सुरू होईल. या मार्गामुळे जेएनपीटीकडे जाणारी ठाणे आणि नवी मुंबईतील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. वेळेचीही बचत होईल.
कोठून... कुठे?
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील नवघर (ता. वसई) येथून सुरू होऊन राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील बळवली (ता. पेण) येथे समाप्त होईल.
वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण, अलिबाग मधून जाईल. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याणमधील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाता येईल.
औद्योगिक क्रांतीचा मार्ग
या मार्गावर ९ प्रमुख ग्रोथ सेंटर्स विकसित केली जाणार आहेत -
१. विरार इंडस्ट्री २. आनगाव ३. सापे ४. खारबाव-भिवंडी ५. निळजे-कल्याण ६. तळोजे इंडस्ट्री ७. शेडुंग-पनवेल ८. खोपटा इंडस्ट्री ९. आंबा इंडस्ट्री.
प्रमुख महामार्गांचे 'महाजंक्शन'
हा मार्ग महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांना एकमेकांशी जोडणारा दुवा ठरेल. यामध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-नाशिक, कल्याण-मुरबाड, मुंबई-गोवा याशिवाय मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग (कनेक्टिव्हिटी), (अटल सेतू) आणि मुंबई-वडोदरा एक्सप्रेस साठीही महाजंक्शन मिळणार आहे.
'एमएमसी'चा मुख्य उद्देश
प्रादेशिक दळणवळण सुलभ करणे आणि औद्योगिक विकासास चालना देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
एमएमसीवर दृष्टिक्षेप
एकूण लांबी: १२६ किमी
पहिला टप्पा: ९६.४१ किमी
खर्च: ३९,६१३ कोटी रुपये
कामाची सुरुवात: सप्टेंबर २०२६
पूर्ण कधी होणार?: सन २०३१.
कमी वेळेत प्रवास, वेळेची बचत...
वसई-विरारकडून रायगडकडे जाताना मुंबईमार्गे वळसा घ्यावा लागतो.
किती अंतर कमी होईल?: ३५ ते ४५ किलोमीटर
किती वेळ वाचेल?: १ ते १.३० तास
किती नागरिकांना फायदा?: एमएमआरमधील सुमारे दीड कोटी नागरिक.