व्हायरल व्हिडीओ ही लहान बाब, बदनामी करणाऱ्यांना न्यायालयात खेचू : कोकाटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:13 IST2025-07-23T12:13:16+5:302025-07-23T12:13:37+5:30
आपली भूमिका विशद करीत माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मंगळवारी स्पष्टपणे नकार दिला.

व्हायरल व्हिडीओ ही लहान बाब, बदनामी करणाऱ्यांना न्यायालयात खेचू : कोकाटे
नाशिक : मी एखाद्या महिलेचा विनयभंग केला आहे का? मी अन्य काही गंभीर गुन्हा केला आहे की, कुणा शेतकऱ्याला फसवलंय, असे काय घडलेलं आहे, की मी राजीनामा देऊ? मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडीओ खूप लहान बाब आहे. कारण यामागे षड्यंत्र आहे, अशी भूमिका विशद करीत माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मंगळवारी स्पष्टपणे नकार दिला.
मला राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फाेन आलेला नाही. माध्यमांमध्ये मात्र तसे चित्र रंगविले गेले. सभागृहातील मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल करून नंतर माझी बदनामी करणाऱ्यांना मी न्यायालयात खेचणार आहे, असे कोकाटे पत्रपरिषदेत म्हणाले. मी मोबाइल हातात घेतला तेव्हा रमी गेमची जाहिरात आली. मी ती स्कीप करीत होतो. या संपूर्ण प्रकरणावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र देणार आहे. मी कोणत्याही चौकशीस तयार आहे. सभागृहात माझा ‘तो’ व्हिडीओ कोणी काढला, याचाही तपास सभापतींनी करावा, असेही कोकाटे म्हणाले.
...तर मी राजीनामा देईन
रमीतून मी पैसे हरलो, जिंकलो असेन, तर बँक डिटेल तपासावे. सीडीआर तपासावा. मी सभागृहात एकदा तरी रमी गेम खेळलो, हे सिद्ध झाले, तर मी नागपूर अधिवेशनादरम्यान राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, विरोधकांचा सीडीआर तपासावा, असे आव्हान कोकाटे यांनी दिले.
माध्यमांवर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
कोकाटे यांनी सभागृहात गेम खेळला असेल तर हे चुकीचेच आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हाेते. याबाबत माध्यमांमधील बातम्यांवर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांनी तसे विधान केले असावे, असे कोकाटे म्हणाले.
जाहिरात स्किप करायला ४२ सेकंद लागतात का?
सभागृहात आपण मोबाइल बघत होतो तेव्हा कामकाज संपले होते, तसेच आपण जाहिरात स्कीप करत होतो, असा खुलासा करणाऱ्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे यासंदर्भातील दोन व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट केले.
रोहित पवार यांनी लिहिले आहे की, सभागृहाचे कामकाज संपले होते हे कृषिमंत्री महोदयांचे विधान खोटे आहे. उलट आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरे देण्याच्या विषयावर चर्चा सुरू होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा कोणती जाहिरात स्कीप करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?” विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसेच काहीसं कोकाटेंचे झालेय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असे वाटत होते पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.