व्हायरल फिव्हर : ‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 15:17 IST2017-08-24T15:16:46+5:302017-08-24T15:17:21+5:30
पाठव पुढेचा धडाका : व्हॉटस्अॅप आणि फेसबुकवर धुमाकूळ

व्हायरल फिव्हर : ‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी
ज्ञानेश्वर मुंदे/ यवतमाळ : ‘आज रात्री कॉस्मिक किरणांचा मारा होणार, मोबाइल बंद ठेवा’, ‘महत्त्वाची कागदपत्रे सापडली, संबंधितापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा’ असे संदेश व्हॉट्सअॅप तर ‘जानिए अपके पिछले जन्म के रहस्य’, ‘चोरी छिपे आपका प्रोफाईल कोण देखता है, ‘जय हिंद लिखकर शेअर करे’ अशा पोस्ट फेसबुकवर धडधड येऊन पडतात. ‘पाठव पुढे’चा धडाका लावत सोशल भक्तांची अंध मुशाफिरी सुरू आहे.
काही वर्षापूर्वी संवादाचे माध्यम असलेला मोबाइल आता गॅझेट झाले आहे. कोणतीही गोष्ट अवघ्या काही क्षणात मोबाइलवरुन करणे शक्य झाले आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या अदान-प्रदानापर्यंत सर्वच मोबाइलवर होऊ लागले. त्यातच काही कंपन्यांनी अल्पदरात मुबलक डाटा दिल्याने ग्राहकांची संख्या वाढली. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आणि या स्मार्ट फोनने अनेकांना भुरळ पाडली. फेसबुक आणि व्हॉटस्अॅप तर प्रत्येकाचा श्वास झाला आहे. अनेकांना त्याचे व्यसनच लागले आहे. दर पाच-दहा मिनिटांनी मोबाइलवर बोटे फिरवून ‘जगाच्या संपर्कात’ राहण्याचा प्रयत्न करतात.
सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश
व्हॉटस्अॅपचे व्यसन प्रत्येक स्मार्ट फोनधारकाला लागले आहे. त्यावर येणारे मॅसेज पाठविण्याचा आनंद प्रत्येकच जण घेत आहे. मात्र अनेकदा कोणतीही खातरजमा न करता मॅसेज समोर पाठविले जातात. त्यातून अनेकदा सामाजिक समस्या, सामाजिक तेढ निर्माण करणा-या घटना घडतात. याचा अनुभव अनेकांनी घेतलाही आहे. काहींवर तर गुन्हेही दाखल झाले. परंतु त्यातून कुणी सुशिक्षित झाला नाही. अलिकडे तर भीती निर्माण करणारेही मॅसेज येतात.
एकच मॅसेज दहादा
एकाच ग्रुपवर दहादा तोच तो मॅसेज वाचावा लागतो. काही दिवसापूर्वी आज कॉस्मेटिक किरणांचा मारा होणार, आपला मोबाइल मध्यरात्रीपासून बंद ठेवा, असे संदेश फिरत होते. यासाठी नासाची बीबीसी न्यूज सर्च करा, असेही सांगितले जाते. परंतु या मॅसेज खाली कुठलीही तारीख दिलेली नसते. त्यामुळे तो मॅसेज नेमका केव्हाचा हेही समजत नाही. परंतु आपल्याला माहीत झाले, दुस-यांना माहीत व्हावे या अंध:विश्वासातून हा मॅसेज सारखा फिरत असतो. महत्त्वाची कागदपत्रे सापडली, कुणाला तरी मिल्ट्रीचा कॉल आला परंतु त्याचा पत्ता चुकीचा आहे, संबंधितांपर्यंत पोहोचविण्यास मदत करा असे एक ना अनेक मॅसेज बीप बीप धडकत असतात. फेसबुकवरही अलिकडे युझर्सला भुरळ घालणारे पोस्ट येत आहे. भावनात्मक आवाहन केले जाते तर कधी भीती दाखविली जाते. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी भविष्यात कोणते संकट उभे करेल हे सांगता येत नाही.
अखेर न वाचताच मॅसेज डिलीट
प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये किमान दहा ग्रुप तरी असतात. प्रत्येक ग्रुपवर दिवसाला २० मॅसेज आले तरी दिवसाकाठी २०० मॅसेज येऊन पडतात. त्यासोबत इमेजेसही असतात. कुणालाच एका दिवशी २०० मॅसेज वाचण्यासाठी वेळ नसते. मग बल्कमध्ये मॅसेज डिलिट केले जातात. यात अनेकदा महत्वाचे संदेशही नाईलाजाने डिलीट होतात. सोशल मीडियावर मुशाफिरी करताना काय महत्त्वाचे आणि कुणाला पाठवायचे याचा विचार करूनच पोस्ट करणे अपेक्षित आहे.