नागपूरमध्ये नगरपालिका निवडणुकीला हिंसक वळण, भाजपा आमदारावर गुन्हा

By Admin | Updated: January 8, 2017 14:37 IST2017-01-08T13:35:47+5:302017-01-08T14:37:51+5:30

नागपूरमध्ये नगरपालिका निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे. काटोल येथे विदर्भ माझा आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने

Violent turn of the municipal elections in Nagpur, crime against BJP MLA | नागपूरमध्ये नगरपालिका निवडणुकीला हिंसक वळण, भाजपा आमदारावर गुन्हा

नागपूरमध्ये नगरपालिका निवडणुकीला हिंसक वळण, भाजपा आमदारावर गुन्हा

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 8 -  जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांसाठी आज मतदान होत असून यापैकी काटोलमध्ये किरकोळ वादाची स्थिती दुपारी १२ वाजताच्या सुमारास उद्भवली. दोन विरोधी गट एकमेकांसमोर ठाकल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. दरम्यान, पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिका-यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही गटाला शांत केले असून भाजपा आमदार आशिष देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सध्या काटोलमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. 

काटोल नगरपरिषद निवडणूक रिंगणात भाजप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही उडी मारली आहे. त्यातच भाजपपासून दुरावलेला चरणसिंग ठाकूर गट हा विदर्भ माझा पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे काटोलमधील निवडणूक रंगतदार झाली आहे. 
 
अशात आज मतदानाच्या दिवशी दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्रभाग क्र. २ मधील हेटी परिसरात विदर्भ माझा पक्षाचे उमेदवार चरणसिंग ठाकूर हे आपल्या समर्थकांसह आपल्या चारचाकी वाहनाने फिरत होते. त्यातच ते एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबले. तेवढ्यात काटोलचे भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख हे दुचाकीने तेथे आले. चरणसिंग ठाकूर यांची गाडी रस्त्यावर उभी असल्याने त्यांनी गाडी कुणाची आहे, पैसे वाटत आहे का, असे म्हणत त्या गाडीच्या दिशेने दगड भिरकावला. त्यामुळे गाडीचा मागचा काच फुटला. परिणामी चरणसिंग ठाकूर आणि आ. देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. ही बाब ठाकूर यांचे कंत्राटदार बंधू राजू ठाकूर यांना समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तेसुद्धा हमरीतुमरीवर आले. त्यासोबतच नगर परिषदेत गेल्या सहा महिन्यांपूर्वी सत्ता असलेले शेकापचे माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख हेसुद्धा तेथे पोहोचले. त्यामुळे वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत होते. 
 
हेटी प्रभागात वाद सुरू असल्याची बाब मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गाडीचा पंचनामा करून दोन्ही गटाला शांत करीत घटनास्थळ सोडण्यास भाग पाडले. या प्रकरणी काटोल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून. तर निवडणूक निर्णय अधिकारीही या प्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे. 
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या परिसरात मतदान केंद्र नाही. दुसरीकडे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना या परिसरात फिरण्यास मज्जाव असून प्रचारावही बंदी आहे. त्यामुळे हे उमेदवार तेथे गेले कसे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 
 
आमदार आणि ठाकूरांमध्ये दुरावा 
काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर गटाची पाच वर्षांआधीच्या १० वर्षे सत्ता होती. २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत ठाकूर गटाला शेतकरी कामगार पक्षाचे राहुल देशमुख यांनी धक्का देत सत्ता स्थापन केली. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी शेकापच्या १० नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आल्याने शेकापच्या हातातील सत्तेची चावी भाजप समर्थित ठाकूर गटाकडे आली. मात्र या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये जोरदार हालचाली होऊन चरणसिंग ठाकूर हे आपल्या गटासह विदर्भ माझा पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले. सध्यास्थितीत विदर्भ माझा पक्ष, भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, राष्ट्रीय समाज पक्ष, बसपचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून विदर्भ माझा पक्ष, भाजप आणि शेकाप अशी तिहेरी रंगत आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या काँग्रेसच्या उमेदवार हे तिहेरीमध्ये नाही, हे विशेष! त्यातच विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या पक्षाच्या उमेदवार या बºयाच लांब आहेत.

Web Title: Violent turn of the municipal elections in Nagpur, crime against BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.