नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाही - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:04 IST2025-03-19T07:02:51+5:302025-03-19T07:04:06+5:30
पोलिसांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, सोशल माध्यमे तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाही - मुख्यमंत्री
मुंबई/नागपूर : नागपुरात सोमवारी रात्री घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना अजिबात सोडण्यात येणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. दरम्यान, सोमवारी सायंकाळनंतर महाल, हंसापुरी भागात झालेल्या दोन गटांमधील संघर्षानंतर मंगळवारी संपूर्ण नागपुरात तणावपूर्ण शांतता होती. शहरातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलिसांनी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, सोशल माध्यमे तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नागपूरच्या हिंसाचारावर निवेदन करताना फडणवीस म्हणाले की, निश्चितपणे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. हल्ल्यात तीन उपायुक्तांसह ३३ पोलिस जखमी झाले. एका उपायुक्तावर तर कुऱ्हाडीने हल्ला झाला. महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. इथे शांतता राहिली तर प्रगतीकडे जाऊ. यापुढे कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर जात, धर्म न पाहता कारवाई केली जाईल.
काही झाले तरी त्यांना सोडण्यात येणार नाही : फडणवीस
११ पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तसेच, एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस महासंचालकांनी राज्यभर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांवरील हल्ले अजिबात सहन करणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झाले तरी सोडण्यात येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाईल : एकनाथ शिंदे
नागपूरमध्ये आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही समाजाला शांत केले होते. मात्र, काही तासांत लगेचच दोन-पाच हजाराचा मॉब कसा जमला. घरात मोठे दगड टाकले. हॉस्पिटलची तोडफोड केली. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केले गेले. दंगेखोरांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले. वाहनेही जाळण्यात आली. एका विशिष्ट ठिकाणी शंभर - दीडशे बाइक पार्क व्हायच्या पण काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती. याचा अर्थ हे नियोजनपूर्वक षडयंत्र होते. या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.