विधान परिषद सभागृह नेतेपदी विनोद तावडे?
By Admin | Updated: June 10, 2016 05:06 IST2016-06-10T05:06:59+5:302016-06-10T05:06:59+5:30
विधान परिषद सभागृह नेतेपदी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना नियुक्त करण्यास पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिल्याचे समजते.

विधान परिषद सभागृह नेतेपदी विनोद तावडे?
अतुल कुलकर्णी,
मुंबई- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याने रिकाम्या झालेल्या विधान परिषद सभागृह नेतेपदी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना नियुक्त करण्यास पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिल्याचे समजते. एका ज्येष्ठ मंत्र्याने या माहितीस दुजोरा दिला.
विधान परिषदेत नव्याने आलेल्या १० सदस्यांमुळे अनेक राजकीय गणिते बदलली आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या दुहेरी हल्लयाला तोंड देण्यासाठी मराठा समाजाचा नेता सभागृहात असावा असे समीकरण पुढे आल्याने तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. तावडेंना हे पद देऊ केल्यास पक्षाच्या दृष्टीने काही फायदे असल्याचेही सांगितले जाते. तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे खडसे प्रकरणानंतर नाराज होते. मुंडे यांनी स्वतंत्र पोस्टर्स लावली होती. हे सगळे पहाता परिषदेच्या नेतेपदाची जबाबदारी तावडेंवर टाकण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. पावसाळी अधिवेशन १८ जुलै पासून सुरु होणार आहे. त्यावेळी ही घोषणा केली जाईल. तावडे हे पद घेण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. मध्यंतरी अग्नीरोधक यंत्रे खरेदी करण्याचे प्रकरण गाजले होते. त्या पार्श्वभूमीवर देखील तावडेंकडे नेतेपद देण्याच्या कृतीचे पक्षात वेगळे समर्थन केले जात आहे. दरम्यान, राणे यांनी खडसेंच्या राजीनाम्यावर राजकीय मुत्सदीगिरी दाखवत प्रतिक्रीया दिली. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचे खंडन केले.
हे पहाता काँग्रेसमधील संघर्षही नजीकच्या काळात पहायला मिळेल असे सांगितले जाते. माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. अशोक चव्हाण या सगळ्यांना राणे एका ठराविक चौकटीत रहावेत असे वाटते. त्यातूनच त्यांना उपसभापती पदाचे उमेदवार करण्याचे घाटले जात आहे. पण राणे हे पद घेऊन कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला चौकटीत अडकवून घेणार नाहीत. एकूणच भाजपा आणि काँग्रेस यांच्यात विधानपरिषदेतील दोन पदांवरुन येत्या काळात राजकारण पहायला मिळेल हे नक्की.
पावसाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता
पावसाळी अधिवेशनात ही घोषणा केली जाईल. तावडे हे पद घेण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. मध्यंतरी अग्नीरोधक यंत्रे खरेदी करण्याचे प्रकरण गाजले होते. त्या पार्श्वभूमीवर देखील तावडेंकडे नेतेपद देण्याच्या कृतीचे पक्षात वेगळे समर्थन केले जात आहे.