‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांच्या विधानाला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:01 IST2023-05-09T17:59:54+5:302023-05-09T18:01:35+5:30
Maharashtra Politics: सामना अग्रलेखावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत.

‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांच्या विधानाला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर
Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. सामना अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यासंदर्भात केलेल्या विधानांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही, असे म्हटले होते. यावर आता ठाकरे गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे.
सामनातील अग्रलेखाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू दे. आम्ही आमचे काम करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काय करतो, हे त्यांना माहिती नसते. मात्र, आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक असते, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर मीडियाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
सामनातील अग्रलेख खासदार संजय राऊत लिहितात
सामनातील अग्रलेख खासदार संजय राऊत लिहितात. राजकारण आणि समाजकारण याचा गाढा अभ्यास असलेले संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच ते त्यांचे विचार ‘सामना’तून मांडत असतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच “सामनातील अग्रलेख कोणी गांभीर्याने घेवो अथवा न घेवो. मात्र, माध्यमांची रोजच्या दिवसाची सुरुवात ‘सामना’च्या अग्रलेखानेच होते, हे सुद्धा नाकारता येत नाही, असे विनायक राऊत म्हणाले.
दरम्यान, शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. मात्र, पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यामुळेच निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली होती.