विनायक मेटे की जयदत्त क्षीरसागर ? बीड विधानसभेसाठी युतीसमोर पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:08 IST2019-06-25T13:08:03+5:302019-06-25T13:08:10+5:30
एकेकाळी राष्ट्रवादीचे बीडमध्ये वर्चस्व होते. मात्र आज घडीला राष्ट्रवादीची बीड जिल्ह्यात पिछेहाट झाली आहे. बीड मतदार संघात राष्ट्रवादीकडून क्षीरसागरांचे पुतणे संदीप क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र युतीत या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे.

विनायक मेटे की जयदत्त क्षीरसागर ? बीड विधानसभेसाठी युतीसमोर पेच
बीड - लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुप्पटीने वाढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच भाजप-शिवसेना विधानसभा निवडणूकही एकत्र लढणार हे निश्चित झालं होतं. परंतु, घटक पक्षांच काय हे त्यावेळी ठरल नव्हत. आता घटक पक्षांनी जोर लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे घटक पक्षांना युतीत स्थान मिळणार हे निश्चित झाले. परंतु, विनायक मेटे यांच्या भारतीय संग्राम परिषदेमुळे बीडच्या जागेवरून पेच निर्माण होणार शक्यता आहे. दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या पक्षांतरामुळे बीड विधानसभा कोण लढवणार विनायक मेटे की शिवसेनेचे क्षीरसागर असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीचा गड असलेल्या बीड जिल्ह्यावर भाजपने मजबूत पकड निर्माण केली आहे. तर राष्ट्रवादीचे बडे नेते जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेऊन शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे शिवसेना बीडमध्ये संघटन वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे हे स्पष्टच आहे. परंतु, यामुळे पेच निर्माण झाला आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत विनायक मेटे यांनी क्षीरसागरांना आव्हान दिले होते. त्यावेळी मेटेंना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. मेटेंनी तेव्हा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. आता क्षीरसागरच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आले आहे. त्यामुळे २०१९ मध्ये बीडमधून सेना की, मेटे असा प्रश्न उपस्थित होते आहे.
एकेकाळी राष्ट्रवादीचे बीडमध्ये वर्चस्व होते. मात्र आज घडीला राष्ट्रवादीची बीड जिल्ह्यात पिछेहाट झाली आहे. बीड मतदार संघात राष्ट्रवादीकडून क्षीरसागरांचे पुतणे संदीप क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र युतीत या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मेटेंनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपसोबत पण जिल्ह्यात नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी भाजप उमेदवार प्रितम मुंडे यांच्या विरोधात जावून राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळे मेटेंविषयी युती काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.