Vinayak Mete Accident: बैठकीची वेळ कोणी बदलली? दुपारी ४ ऐवजी १२ केली; मराठा नेत्याने व्यक्त केला संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 15:15 IST2022-08-14T15:14:37+5:302022-08-14T15:15:47+5:30
Vinayak Mete Accident: मेटे यांनी दोन्ही फोन आलेले तेव्हा मी बीडमध्ये आहे, एवढ्या तातडीने मुंबईला कसा पोहोचेन असे त्या फोनवर पलिकडील व्यक्तीला कळविले होते.

Vinayak Mete Accident: बैठकीची वेळ कोणी बदलली? दुपारी ४ ऐवजी १२ केली; मराठा नेत्याने व्यक्त केला संशय
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे रात्रीच बीडवरून मुंबईसाठी निघाले होते. शनिवारी त्यांना मंत्रालयातून दोनदा फोन आले होते. सुरुवातीला रविवारी दुपारी ४ वाजता बैठक ठरली होती. सायंकाळी सात वाजता त्यांना फोन करून तातडीने मुंबईला या, बैठक १२ वाजता होणार आहे, असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी केला आहे.
मेटे यांनी दोन्ही फोन आलेले तेव्हा मी बीडमध्ये आहे, एवढ्या तातडीने मुंबईला कसा पोहोचेन असे त्या फोनवर पलिकडील व्यक्तीला कळविले होते. परंतू, त्यांच्यावर मुंबईला तातडीने येण्यासाठी दबाव कोणी टाकला, याची चौकशी झाली पाहिजे असे पाटील म्हणाले.
याचबरोबर दुपारी ४ वाजता बैठक ठरली होती. जर वेळ बदलली नसती तर मेटे सकाळी निघून दुपारपर्यंत मुंबईला पोहोचले असते. दुपारी १२ ची वेळ ठेवल्याने मेटे रात्रीच मुंबईला जाण्यासाठी निघाले. ही वेळ कोणी बदलली असा सवाल त्यांनी केला आहे.
याचबरोबर शिवसेनेने देखील मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे. शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा मेटे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मेटे यांना कोणी फोन करून बोलावले, याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.