१ हजारावर लोकसंख्या असलेली गावे सिमेंट रस्त्यांनी जोडली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 06:40 IST2026-03-07T06:40:16+5:302026-03-07T06:40:27+5:30
Maharashtra Budget 2026: ४५०० कोटींची महत्त्वाकांक्षी योजना, २३ हजार किमीचे नवीन रस्ते बांधणार

१ हजारावर लोकसंख्या असलेली गावे सिमेंट रस्त्यांनी जोडली जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी आशियाई बँकेच्या साहाय्याने ४ हजार ५०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली. नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली, नागपूर- चंद्रपूर या प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या कामास मान्यता देण्यात आली आहे.
वाढवण बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडले जाणार आहे. पुणे ते शिरुर हे ५३ किलोमीटर लांबीचे ७५१४ कोटी रुपये किमतीचे उन्नत मार्गाचे कामही मंजूर झाले आहे. तळेगाव-चाकण हा ६४९९ कोटी रुपये खर्चाचा २५ किमीचा उन्नतमार्ग व चाकण-शिक्रापूर हा ५२३२ कोटी रुपये खर्चाचा २८ किमीचा सहापदरी रस्ता यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
हडपसर ते यवत सहापदरी
छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळुंज एमआयडीसी दरम्यान उन्नत मार्गाचे काम दोन टप्प्यांत करणार.
हडपसर-यवत या ५२६२ कोटी रुपये किमतीच्या ३१.५० किमीच्या रस्त्याचे सहापदरीकरण सुरू.
वाड्या-वस्त्यांना रस्ते
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या १९२ किमीचा १४८८६ कोटी रुपये खर्चाच्या ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
टप्पा तीन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागात २३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांची कामे हाती घेण्यात येतील. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ४ मध्ये वाड्या-वस्त्या बारमाही रस्त्याने जोडणार.