अबब...! ३ दिवसातच पडतंय टक्कल; अज्ञात आजारानं गावकरी हैराण, आरोग्य विभाग अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 21:10 IST2025-01-07T21:07:37+5:302025-01-07T21:10:30+5:30
अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अबब...! ३ दिवसातच पडतंय टक्कल; अज्ञात आजारानं गावकरी हैराण, आरोग्य विभाग अलर्ट
शेगाव (जि. बुलढाणा) : तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसांतच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे. ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे, ही बाब अद्याप अस्पष्ट आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणांमुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबांतील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत तिन्ही गावांतील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत. शाम्पूने असा प्रकार घडत असावा, असे डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी
आतापर्यंत आरोग्य विभागाने कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या तीनही गावांमध्ये उद्भवलेल्या समस्येबाबत उपचार शिबिर घेण्याची मागणी शेगाव तालुका (शिवसेनाप्रमुख) रामेश्वर थारकर यांनी केली आहे.
तीन गावांत आजाराचे थैमान
कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावांमध्ये केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत आहे. तीन दिवसातच आपोआप टक्कल पडत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते यांना निवेदन देत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
सर्वेक्षणात आढळले ३० बाधित
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले. त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने ३० जण बाधित असल्याची माहिती पुढे आली. त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्यांच्याकडून रुग्णांची लक्षण आणि उपचार सुरू करण्यात आले.
या कारणांमुळे आजाराची शक्यता
गावातील पाण्याचा स्त्रोत दूषित आहे का, तसेच पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काही रुग्णांची त्वचारोग तज्ज्ञांकडे उपचार घेतले असता शॅम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो, अशी माहिती त्यांना देण्यात आली.
तीनही गावातील केस गळतीच्या समस्येबाबतची माहिती मिळतात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावात पोहचले. त्यांनी सर्वेक्षणासोबतच आरोग्यविषयक सल्ला दिला आहे. लक्षणानुसार औषधोपचारही सुरू केला. या समस्येवर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. - डाॅ. दीपाली बाहेकर, तालुका आरोग्य अधिकारी, शेगाव.