Vidhan Parishad Election: दोन्ही उमेदवार विजयी पण शिवसेनेची ३ मते कुठे गेली?; चर्चा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 22:30 IST2022-06-20T22:30:09+5:302022-06-20T22:30:50+5:30
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांना २९ आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना २८ मते पडली

Vidhan Parishad Election: दोन्ही उमेदवार विजयी पण शिवसेनेची ३ मते कुठे गेली?; चर्चा सुरू
मुंबई - राज्यसभा निकालानंतर विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपाला पहिल्या पसंतीची जवळपास १३३ मते पडली आहेत. त्यामुळे ही वाढलेली मते कुणाची याची कुजबूज सुरू झाली आहे. त्यात शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मते पडली. मग शिवसेनेची हक्काची ३ मते कुणाला गेली? अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर, आमश्या पाडवी यांना पहिल्या पसंतीची २६ मते पडल्याने दोघंही विजयी झाले. परंतु या विजयानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण शिवसेनेचे एकूण ५६ आमदार होते. त्यातील रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेकडे ५५ आमदारांचं संख्याबळ होते. शिवसेनेकडे ५५ आमदारांव्यतिरिक्त काही अपक्ष, घटक पक्षांची मते होती. परंतु विधान परिषद निकालात शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मते पडली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांना २९ आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना २८ मते पडली. राष्ट्रवादीकडे एकूण मतांच्या ६ मते जास्त पडली आहेत. त्याचसोबत भाजपाचे प्रविण दरेकर यांना २९, श्रीकांत भारतीय ३०, उमा खापरे २७ आणि राम शिंदे यांना ३० मते पडली आहेत. त्याचसोबत प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते पडली आहेत.
दहाव्या जागेसाठी सस्पेन्स
विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. मात्र या निकालात राष्ट्रवादी २, शिवसेना २ आणि भाजपाचे ४ उमेदवार निवडून गेले. परंतु नवव्या आणि दहाव्या जागेसाठी ३ उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली. यात भाजपाचे प्रसाद लाड, काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत आहे. दरम्यान, हा विजय शिवसेनेचा आहे. उद्धव ठाकरेंनी जेव्हा माझे नाव घेतले तेव्हाच माझाच विजय झाला. माझ्या समाजासोबत सर्वांसाठी मी काम करणार आहे असं शिवसेनेची विजयी उमेदवार आमश्या पाडवी यांनी म्हटलं.