Video: उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर संतोष बांगर मैदानात; हिंगोलीत जनसमुदाय लोटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 15:59 IST2023-08-28T15:59:25+5:302023-08-28T15:59:53+5:30

हा नाग भोळ्या शंकराच्या गळ्यातला आहे. नागाने फणा मारला, शंकराने तिसरा डोळा उघडला तर तुमचा भस्म होईल असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Video: Shiv Sena MLA Santosh Bangar criticized Uddhav Thackeray, showed strength in Hingoli | Video: उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर संतोष बांगर मैदानात; हिंगोलीत जनसमुदाय लोटला

Video: उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर संतोष बांगर मैदानात; हिंगोलीत जनसमुदाय लोटला

हिंगोली – रविवारी उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत सभा घेत स्थानिक आमदार संतोष बांगर यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संतोष बांगर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाकरेंवर पलटवार केला. संतोष बांगर यांनी कावड यात्रेचे आयोजन केले होते. या कावड यात्रेत बांगर यांच्यावर प्रेम करणारे हजारो समर्थक सहभागी झाले होते. अक्षरश: लोकांच्या गर्दीने रस्ता खचाखच भरलेला होता. त्यात एका वाहनाच्या टपावर आमदार संतोष बांगर आणि कालिचरण महाराज होते.

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर आमदार संतोष बांगर म्हणाले की, आम्ही हिंदुस्थानात जन्म घेतलाय, पण तुम्ही MIM शी हातमिळवणी करताय तर थू तुमच्या जिंदगीवर. भगवा कधीही सोडणार नाही. एक जिल्हाप्रमुख ५ पक्ष बदलले आहेत. ते म्हणतात आम्ही निष्ठावंत. काल कुणीतरी आम्हाला म्हटलं की हा नाग आहे. पण हा नाग भोळ्या शंकराच्या गळ्यातला आहे. नागाने फणा मारला, शंकराने तिसरा डोळा उघडला तर तुमचा भस्म होईल असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

तसेच हे शक्तीप्रदर्शन नाही, हे शिवभक्त आहेत. हिंदुत्वाला मानणारे आहेत. ही प्रेम करणारी जनता आहे. ही जनता भोळ्या शंकरावर प्रेम करणारी, भगव्या ध्वजावर प्रेम करणारी आहे. हिंदुत्ववादी विचारांची कावड आहे याचे दर्शन महाराष्ट्राला दाखवावे. वाशिम, यवतमाळ, नांदेड, जालना, परभणी याठिकाणाहून ठाकरेंच्या सभेला गर्दी करण्याचा प्रयत्न केला तरी सभेचा मांडव भरला नाही. परंतु आज ही लोकांची गर्दी बघताय ती हिंगोलीतल्या लोकांची आहे असंही आमदार संतोष बांगर यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

जो नाग चांगला आहे म्हणून पूजा केली, तोच उलटा फिरून डसायला लागला. हे कशामुळे घडले हे तुम्हाला कळते. शेतकरी अशा सापांना पायाखाली तुडवतो. उद्धट वागणारा, अवैध धंदे करणारा कावड यात्रा काढून बनाव करीत असला तरीही तो कसा हिंदू म्हणवून घेऊ शकतो. आपल्याच लोकांवर उद्धटपणा करीत असेल तर त्याला गाडून टाकण्याचे काम करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना हिंगोली येथील सभेत आ. संतोष बांगर यांचे नाव न घेता केले होते.

Web Title: Video: Shiv Sena MLA Santosh Bangar criticized Uddhav Thackeray, showed strength in Hingoli