Video - "एका कुटुंबाचा नाही, बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा"; शिंदे गटाचा नवा टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 16:38 IST2022-10-04T16:36:41+5:302022-10-04T16:38:45+5:30

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान आता  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

Video CM Eknath Shinde releases Shivsena dasara melava new Teaser | Video - "एका कुटुंबाचा नाही, बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा"; शिंदे गटाचा नवा टीझर रिलीज

Video - "एका कुटुंबाचा नाही, बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा"; शिंदे गटाचा नवा टीझर रिलीज

यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी तयारी करत आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान आता  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

"एका कुटुंबाचा नाही, बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा" असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा नवा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "हिंदुत्वाचा रथ पुढे नेणारा मेळावा, विचारधारा विसरणाऱ्यांना धडा देणारा मेळावा... एका कुटुंबाचा नाही, बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा" असं टीझरमध्ये म्हटलं आहे. बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार आहे. 

"एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ"

शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. शिंदे गटाने याआधी दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज केला होता. त्यामध्ये "एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ" असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असंही म्हटलं आहे. 

"आम्ही विचारांचे वारसदार"

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहेत. तसेच या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो ठळकपणे लावण्यात आले आहेत. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. तसेच आम्ही विचारांचे वारसदार असे या पोस्टरवर लिहून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. तसेच बाळासाहेब तुमचा वाघ आहे म्हणून हिंदुत्वाला जाग आहे, असा एक बॅनर प्रसिद्ध करत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चिमटा काढला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Video CM Eknath Shinde releases Shivsena dasara melava new Teaser