उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:16 IST2025-08-23T12:12:42+5:302025-08-23T12:16:05+5:30
Vice Presidential Election 2025: यावरून एकच स्पष्ट होते की, पवार-ठाकरे यांच्या भूमिकेला वैचारिक बैठकच नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
Vice Presidential Election 2025: प्रखर राष्ट्रवाद, संविधानावर श्रद्धा आणि सर्वसमावेशक राजकारण असा इतिहास असलेली व्यक्ती आमच्या विचाराची नाही असे शरद पवार उघडपणे सांगतात, मग त्यांची नेमकी विचारसरणी कोणती, असा सवाल महाराष्ट्राने त्यांना विचारला पाहिजे. पक्षाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस हे नाव आणि राष्ट्रवादी विचारास विरोध हा त्यांच्या कथनी आणि करणीतून उघड झाला आहे. त्यामुळे, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही केवळ विरोधाभासी नाही, तर थेट राष्ट्रहिताविरोधी आहे, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मते मिळावीत हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. परंतु, या दोन्ही नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे म्हटले जात आहे. यावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट करून निशाणा साधला आहे.
...हे तर थेट देशाच्या सुरक्षेशी खेळणे!
संविधाननिष्ठ, स्पष्टवक्ते आणि राष्ट्रभक्तीचा विचार जोपासणारे राधाकृष्णन यांना ‘आमच्या विचारांचे नाहीत’ म्हणून नाकारणे हा विचारांचा संकुचितपणा आणि राजकीय द्वेषाचा कळस आहे. नक्षलवाद्यांप्रती सौम्य भूमिका ठेवणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणे, हे तर थेट देशाच्या सुरक्षेशी खेळणे! नक्षलवाद हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका असून, अशा विचारसरणीला पाठबळ देणाऱ्या व्यक्तीला उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य मानणे म्हणजे जनतेशी विश्वासघातच! ज्या आंध्र प्रदेशातून इंडिया आघाडीचा उमेदवार उभा आहे, त्याच राज्यातील प्रमुख नेत्यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे. यावरून एकच स्पष्ट होते- पवार-ठाकरे यांच्या भूमिकेला वैचारिक बैठकच नाही. ही तर फक्त राजकीय स्वार्थाची नौटंकी आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी या पोस्टमध्ये केली आहे.
शरद पवार नेमके काय म्हणाले?
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उपराष्ट्रपतिपदासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून दोन ते तीन नावाची चर्चा केली. त्यानंतर सर्वांचे एकमत झाले. सत्ताधाऱ्यांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत म्हणून सहकार्य करावे ही विनंती केली. तथापि मी ते शक्य नाही असं म्हटले. कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत. राऊतांशी बोलणे झाले असून त्यांचीही चर्चा झाली. त्यांचा आणि आमचा निर्णय एकच आहे. आम्ही आमचे बघतो, त्यांनी काय करायचे, ते ठरवतील, निकाल वेगळा लागेल.
दरम्यान, काँग्रेसकडे लोकसभेत १४ व राज्यसभेत ३ अशी १७ मते आहेत. मविआकडील ३८ पैकी एकही मत फुटू नये यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोकसभेत ९ तर राज्यसभेत २ खासदार आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेत ८ तर राज्यसभेत २ खासदार आहेत. दोघांची मिळून तब्बल २१ मते आहेत. ती मिळविण्याच्या हालचाली मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता सुरू केल्या आहेत.
प्रखर राष्ट्रवाद, संविधानावर श्रद्धा आणि सर्वसमावेशक राजकारण असा इतिहास असलेली व्यक्ती आमच्या विचाराची नाही असे शरद पवार उघडपणे सांगतात, मग त्यांची नेमकी विचारसरणी कोणती, असा सवाल महाराष्ट्राने त्यांना विचारला पाहिजे. पक्षाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस हे नाव आणि राष्ट्रवादी विचारास…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 23, 2025