ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे स्मृतिदिन

By Admin | Published: September 22, 2016 01:03 PM2016-09-22T13:03:54+5:302016-09-22T13:03:54+5:30

मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा आज ( २२ सप्टेंबर) स्मृतिदिन.

Veteran actress Durga Khoka Memorial Day | ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे स्मृतिदिन

ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे स्मृतिदिन

googlenewsNext
>(१४ जानेवारी १९०५ – २२ सप्टेंबर १९९१)
- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २२ - मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा आज ( २२ सप्टेंबर) स्मृतिदिन. १४ जानेवारी १९०५ मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव लाड. महाविद्यालयात शिकत असतानाच बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी त्यांनी विवाह केला. मोहन भवनानींच्या फरेबी जाल या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका देण्यात आली. या चित्रपटातील काही भाग बोलका होता. प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा (१९३१) या पहिल्याच बोलपटात त्यांनी तारामतीची भूमिका केली.
 
दुर्गाबाईंनी अयोध्येचा राजा, मायामच्छिंद्र या प्रभातच्या चित्रांत आपली गाणी स्वतःच म्हटली होती. त्यांनी अयोध्येचा राजा मध्ये गायिलेली ‘बाळा का झोप येईना’, ‘आनंद दे अजि सुमन लीला’, ‘बाळ रवि गेला’ ही गाणी त्या वेळी अतिशय लोकप्रिय झाली होती. पुढे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स या प्रख्यात संस्थेने त्यांनाराजारानी मीरा या चित्रपटासाठी पाचारण केले. तेथे त्यांना देवकी बोससारखा आणखी एक श्रेष्ठ दिग्दर्शक लाभला. कॅमेऱ्यासमोर अभिनय कसा करावा याचे शिक्षण दुर्गाबाईंना प्रभात फिल्म कंपनीत मिळाले, तर हळुवार व सहजसुंदर अभिनय त्या न्यू थिएटर्समध्ये शिकल्या. त्यानंतर त्या सीता, पृथ्वीवल्लभ, अमरज्योति, लाखाराणी, हम एक हैं, तसेच मुगले आझम, नरसीभगत, बावर्ची, खिलौना, बॉबी आदी विविध हिंदी चित्रपटांत चमकल्या. तसेच गीता, विदुर, जशास तसे, पायाची दासी, मोरूची मावशी, सीता स्वयंवर, मायाबाजार यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. पायाची दासी या चित्रपटात खाष्ट सासूची भूमिका करून त्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळा पैलू दाखविला.
 
आतापर्यंत शंभरांहून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. पॉल झिलच्या अवर इंडिया  व इस्माईल मर्चंट यांच्या हाऊस-होल्डर  या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
 
१९४८ पासून दुर्गाबाईंचा मराठी रंगभूमीशी संबंध आहे. बेचाळीसचे आंदोलन, कीचकवध, भाऊबंदकी, शोभेचा पंखा, वैजयंती, खडाष्टक, पतंगाची दोरी, कौंतेय, संशयकल्लोळ इ. नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या; तर वैजयंती, कौंतेय, पतंगाची दोरी, द्रौपदी इ. नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. अखिल भारतीय नाट्यस्पर्धेत भाऊबंदकी हे नाटक सर्व भाषांतील नाटकांत सर्वोत्तम ठरले होते. दुर्गाबाईंनी त्यात आनंदीबाईंची अत्यंत प्रभावी भूमिका केली होती.
 
त्यांची चित्रपटातील व नाट्यसृष्टीतील कामगिरी लक्षात घेऊन संगीतनाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला. दिल्लीमध्ये भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते (१९६१). त्यांना पद्मश्रीचा बहुमानही लाभला आहे. (१९६८). मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक त्यांना देण्यात आले होते (१९७२).
 
अलाहाबाद येथील महाराष्ट्र मित्र मंडळ व साहित्य संमेलन या मान्यवर संस्थांच्या विद्यमाने त्यांचा ३१ जानेवारी १९७० रोजी भव्य सत्कार झाला होता. दुर्गाबाईंच्या अभिनयकलेचा वाङ्‌मयीन सन्मान करण्याच्या उद्देशाने एक गौरवग्रंथ त्यांना अर्पण करण्यात आला; त्याचे प्रकाशन भारताच्या महामंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. १९५२ साली भारतातर्फे रशियाला भेट दिलेल्या सांस्कृतिक मंडळाच्या त्या एक सदस्या होत्या. दुर्गा खोटे प्रॉडक्शन्स ही त्यांची अनुबोध व प्रसिद्धीपट निर्माण करणारी संस्था आहे. १९७४ च्या बिदाई चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना फिल्म फेअर पुरस्कार देण्यात आला.
२२ सप्टेंबर १९९१ साली त्यांचे निधन झाले. 
 
सौजन्य : मराठी विश्वकोश 
 

Web Title: Veteran actress Durga Khoka Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.