"तिचं जाणं ही सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी"- उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 12:03 PM2020-09-02T12:03:04+5:302020-09-02T12:08:28+5:30

कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी "कोमल न्यू लाईफ फाउंडेशन" या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशन साठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली

Very bad news for not only Satara also Maharashtra over Komal Pawar Godse - Udayan Raje Bhosale | "तिचं जाणं ही सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी"- उदयनराजे

"तिचं जाणं ही सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी"- उदयनराजे

googlenewsNext

सातारा - शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार – गोडसे हिचं जाणं सातारकारांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी आहे अशी भावना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत उदयनराजेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे, त्यात म्हटलं आहे की,  कोमलला २०१७ साली "प्लमोनरी हायपरटेन्शन" या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली, महाराष्ट्रातील पहिली "दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण" झालेली व्यक्ती कोमल ठरली होती. पण ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला असं ते म्हणाले.

तसेच कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी "कोमल न्यू लाईफ फाउंडेशन" या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशन साठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख अश्या कोमल ला "सातारा" नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या अगदी लहान बहिणी प्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली असा शोकसंदेश उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

कोण आहे कोमल पवार?

साताऱ्यातील कोमल पवार हिचा फलटण तालुक्यातील तरडफ येथील धीरज विलास गोडसे यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या एक वर्षांतच ती आजारी पडली. तिच्यावर सातारा, पुणे, मुंबई, बेंगलोर येथे उपचार करण्यात आले. मात्र आजार दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असल्याने डॉक्टरांनी हृदय आणि फुफूस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. प्रत्यारोपणासाठी हृदय आणि फुप्फुस उपलब्ध झाले परंतु, केवळ पैशांअभावी इलाज थांबले होते. या शस्त्रक्रियेसाठी केवळ दवाखान्याचा खर्च ३५ लाख तर एकूण खर्च ५४ लाखांच्या घरात जाणार होता. मात्र संपूर्ण सातारकर आणि समाजसेवी संस्थांच्या मदतीने कोमलवर यशस्वी उपचार पार पडले. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर कोमलने तेव्हा मृत्यूवर मात दिली होती.

केवळ अवयवदानामुळे तिला पुनर्जन्म मिळाला होता. अवयवदानाने ही किमया साध्य झाली. शरीरातील एकेका अवयवांचे कार्य वेगळे जगण्याचा आनंद देणारे असते. अवयवाचे महत्त्व आगळे असते, स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठीही! हेच या घटनेने सिद्ध केले. त्यानंतर कोमल आणि तिच्या पतीने आपल्या फाउंडेशनमार्फत अवयवदानाचे महत्त्व पटविण्यासाठी जागृती करीत अशा गरजू रुग्णांना मदत करण्याची भूमिका घेतली होती.

Web Title: Very bad news for not only Satara also Maharashtra over Komal Pawar Godse - Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.