पुणे - उद्धवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक नुकतेच प्रदर्शित झाले. ईडीच्या अटकेपासून १०० दिवस जेलमध्ये असताना आलेले अनुभव राऊतांनी त्यात लिहिले आहेत. हेच पुस्तक पुण्यातील उद्धवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी त्यांच्या देवाऱ्यात ठेवले. त्याचे पूजन केले. कोणत्याही आव्हानात्मक कामाची सुरुवात आपल्या देवाऱ्यापासून करतो. मी या पुस्तकाची ४० पाने वाचली. शिवसैनिक म्हणून आम्ही हे वाचणारच आहोत पण याची वाचण्याची गरज भाजपाच्या लोकांना आहे. खऱ्या अर्थाने मोदी काहीच नव्हते त्यांना पाठिंबा कुणी दिला, विश्वगुरू होण्यामागे पायाभरणी कुणी केली, हे सर्व भाजपाच्या लोकांनी वाचायला हवं असा टोला वसंत मोरे यांनी लगावला.
वसंत मोरे म्हणाले की, जे याला बालसाहित्य म्हणतायेत, त्यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. मोदींसोबत राज्यातील नेत्यांनाही प्रेरणा मिळेल. विरोधात बसून ज्याला यशस्वी राजकारण करायचे आहे त्याने हे पुस्तक वाचले पाहिजे असं राऊत म्हणाले होते. राजकारण चांगले आहे परंतु ते करताना आव्हाने येत असतात. त्यामुळे चांगल्या कामाची सुरुवात करत असताना ती देवाऱ्यापासून केली पाहिजे म्हणून मी केले. हे प्रेरणादायी पुस्तक आहे. मला पुणे शहरासोबत राज्यात ठिकठिकाणी पुस्तकाची मागणी आलीय त्यामुळे मी राऊतांना पुस्तक देण्याची विनंती केली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच पुस्तकात बाजीराव मोदी असा उल्लेख केला आहे. बाजीराव कोण हे पुणेकरांना सांगण्याची गरज नाही. थोरल्या बाजीरावांना अटकेपार झेंडे लावले होते. पुण्यातल्या भाजपाच्या शंभर नगरसेवकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. या पुस्तकातून प्रेरणा मिळते. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पत्राचाळीत ६९२ आसपास घरे आहेत. जे प्रकरण झाले त्यात म्हाडा आणि बिल्डर यांच्यातील वाद आहे. प्रवीण राऊत हे विकासकाचे नाव असेल तर राऊत राऊत जोडण्याचे कारण नाही असंही वसंत मोरे यांनी म्हटलं.
दरम्यान, नरेंद्र मोदींना हटवू नका असं बाळासाहेब ठाकरेंनी लालकृष्ण अडवाणींना सांगितले होते. २०१३ साली मोदींचा चेहरा भाजपाने पुढे आणला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला. त्यांना एक पत्र दिले आणि भाजपा कार्यालयात देण्यास सांगितले. पीयूष गोयल गर्दीतून संजय राऊतांना घेऊन आतमध्ये गेले. कार्यालयात राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी बसले होते. राऊतांना पाहताच नरेंद्र मोदींनी "आ गयी शिवसेना..." हा महत्त्वाचा शब्द आहे. आता शिवसेना आली, अभी मुझे डर नही..शिवसेना पूर्ण ताकदीने भाजपासोबत आहेत असं पत्र दिले. त्यामुळे जे नरेंद्र मोदींना विश्वगुरू म्हणतात. त्यांच्या पंतप्रधानपदाचा पाया रचला गेला तो शिवसेनेने रचला असंही पुस्तकात उल्लेख केल्याचे वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.