Vande Mataram: 'वंदे मातरम' म्हणण्याची सूचना अमित शहांच्या कार्यालयाकडून?; पंकजा मुंडे म्हणता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:33 IST2022-08-16T15:33:06+5:302022-08-16T15:33:21+5:30
सांस्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर 'हॅलो' म्हणण्याऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्याचे आवाहन केले आहे.

Vande Mataram: 'वंदे मातरम' म्हणण्याची सूचना अमित शहांच्या कार्यालयाकडून?; पंकजा मुंडे म्हणता...
मुंबई: सांस्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर 'हॅलो' म्हणण्याऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्याचा फर्मान काढला. हॅलोसारखे शब्द परकीय आहेत, म्हणून हे शब्द टाकणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मुनगंटीवारांचे हे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयातून निघाल्याची चर्चा आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यावरुन चर्चा सुरू झाली आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या आवाहनाला पंकजा मुंडे यांनी समर्थन दिले आहे. त्या म्हणाल्या, 'अमित शहा यांच्या कार्यालयात फोन केला की हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् बोलले जाते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातही फोन केल्यावर फक्त वंदे मातरम् बोलतात, ते ऐकायलाही छान वाटत. आम्हीही इकडून वंदे मातरम् म्हणतो. ज्या गोष्टी बोलल्यामुळे अभिमान वाटतो त्या म्हणायला हरकत नसावी, असं म्हणत पंकजा यांनी या निर्णयाला समर्थन दिले आहे.
‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’वरून वाद
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेवरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. सरकारी कार्यालयात फोनवर नमस्कार करण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते मुनगंटीवार?
मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्याबरोबर हा महत्त्वाचा निर्णय घेतला. आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणला आहे. मी फोन उचलल्याबरोबर ‘हॅलो’ म्हणतो. हा देश जेव्हा गुलामगिरीत होता, तेव्हा त्यांनी हा शब्द दिलेला होता. स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम् म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचे स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रूपाने दिले. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले होते.