बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. सोलापूरसह राज्यातील १४० ऊस तोडणी यंत्र मालकांना ११ कोटी २० लाखांना गंडवल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. नागणे हे हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणीचे काम करतात. या मशिनला प्रत्येकी ३६ लाखाचे अनुदान मिळवून देतो असं सांगून वाल्मिक कराडने प्रत्येक मशीनमागे ८ लाख रुपयांची मागणी केली. तत्कालीन कृषी मंत्री माझ्या जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो, तुम्ही रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या असा आरोप कराड यांनी दिल्याचं नागणेंनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विशेष म्हणजे रोख रक्कमेचे हे पैसे घेऊन ते मुंबईत आले होते. त्यांचे फोटोही समोर आलेत. वाल्मिक कराडला भेटायला ऊस तोडणी यंत्र मालकांना घेऊन ते सह्याद्री अतिथीगृहावर पोहचले होते. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यादेवी, सांगली येथील हे ऊस तोडणी यंत्र मालक होते. या शेतकऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावरील भेटीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला आहे. त्यात वाल्मिक कराडचे निकटवर्तीय जितेंद्र पालवे हे पैसे घेऊन जाताना फोटो आहे. पैसे मोजण्यासाठी मशीनही वापरली होती. आता या प्रकरणा नागणे यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.
पैसे दिल्यानंतर कुठलेही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वाल्मिक कराड याच्याकडे अनुदान मिळाले नाही तुम्ही आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली तेव्हा कराड यांनी त्यांना बीडला बोलवले. त्यावेळी १४० मशीन मालकासह बीड येथे पोहचले असता तुमचे कोणते पैसे असे विचारत कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काहींना मारहाण केली. कराड यांच्या दहशतीमुळे कुणीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. आता वाल्मिक कराड अटकेत असल्याने फसवणूक झालेले मशीन मालक पुढे आले आहेत.