Walmik Karad Latest News: गेल्या २०-२१ दिवसांपासून वाल्मीक कराड कुठेय? असा सवाल विरोधकांकडून केला जात होता. खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या वाल्मीक कराडचे नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणातही घेतले जात आहे. पोलीस आणि सीआयडीची पथके वाल्मीक कराडचा शोध घेत होती, अखेर त्याने मंगळवारी (31 डिसेंबर २०२४) आत्मसमर्पण केले. त्यानंतर सीआयडीने वाल्मीक कराडला केजला पाठवले आहे.
पुण्यात सीआयडीच्या अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आज सकाळी साडेबाराच्या दरम्यान, केज पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी वाल्मीक कराड, हा स्वतःहून सीआयडीच्या मुख्यालयात हजर झालेला आहे. त्याला पुणे सीआयडीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून आम्ही त्याला आमच्या टीमसह तपास पथकाचे बीड सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यासाठी त्यांना रवाना केलेलं आहे.
पुढची प्रक्रिया काय असेल?
सीआयडी अधिकाऱ्याने सांगितले की, "पुढे जे सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक आहेत, ते या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्यांच्या ताब्यात फरार आरोपीला देण्यात येईल", असे त्यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मीक कराडला केज येथे नेण्यात येणार असून, रात्री केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर सीआयडी त्यांची २ कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी करेल.
वाल्मीक कराड शरण आल्यानंतर फडणवीस काय बोलले?
"कोणालाही अशा प्रकारची हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे. त्यामुळेच आज त्यांना (वाल्मीक कराड) त्याठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतील जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम या कामाला लागल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. सगळ्यांना शोधून काढू", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.