प्रत्येक दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’; अशोक चव्हाण, अमिता यांची दिलखुलास उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 05:54 IST2020-02-15T05:53:45+5:302020-02-15T05:54:03+5:30
रितेश देशमुख यांनी घेतली मुलाखत : अशोक चव्हाण, अमिता यांची दिलखुलास उत्तरे

प्रत्येक दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’; अशोक चव्हाण, अमिता यांची दिलखुलास उत्तरे
विशाल सोनटक्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ‘आमचा प्रत्येक दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ असतो़ एकमेकांच्या चेहऱ्यावरूनच मनात काय सुरू आहे याचा उलगडा होतो’, असे सांगत अशोक चव्हाण यांनी अमिता चव्हाण यांना शुक्रवारी व्हॅलेंटाईन डेला सर्वांसमक्ष गुलाबाचे फूल दिले़ निमित्त होते डॉ़ शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘आनंदाचे डोही’ या कार्यक्रमांतर्गत अभिनेता रितेश देशमुख यांनी घेतलेल्या या दोघांच्या प्रकट मुलाखतीचे.
शंकरराव नाना अतिशय कडक शिस्तीचे होते़ त्यांची भीती वाटायची का? इयत्ता ८ वीत असताना शाळेत दप्तर हरविल्यानंतर तासभर तुम्ही त्यांच्या रुममध्ये होतात, त्या तासात काय घडले अशी गुगली रितेश देशमुख यांनी टाकल्यानंतर वेगळं काही घडलं नाही, खोलीत नानांनी स्कूल बॅग हरवल्याबद्दल उलट तपासणी निश्चितपणे घेतली़ मात्र, त्यानंतर आयुष्यात माझी कुठलीच गोष्ट कधी हरवली नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले़
मुंबईत शालेय जीवन गेले़ आपले वडील मुख्यमंत्री, मंत्री आहेत, याचे दडपण यायचे का? या प्रश्नावर आपली ओळख समोर आल्यानंतर पाहणाºयाचा दृष्टिकोन बदलतो़ तसे होवू नये म्हणून तशी ओळख सांगण्याचे शक्यतो टाळायचो़ मात्र, मुंबईने मला खूप काही शिकविले आणि दिलेही़ महत्त्वाचे म्हणजे मुंबईत जात, पात, धर्मभेद कधीही दिसला नाही, असे चव्हाण म्हणाले़
त्यांनी त्यांची मते कधीही आमच्यावर लादली नाहीत. डॉक्टर-इंजिनिअर व्हावे अशी चर्चा होती़ मात्र मला मॅनेजमेंट क्षेत्रात जायचे होते, आणि पदवीनंतर मी एमबीए केले़ तो माझा चॉईस होता़ आज त्याचा मला राजकारणातही उपयोग होतो आहे़, असेही चव्हाण यांनी सांगितले.
रितेश देशमुख यांनी आपली लव्ह स्टोरी कशी जुळली? त्याला घरातून मान्यता कशी मिळाली? असे विचारले़ यावर चव्हाण दाम्पत्यांनी पूर्ण लव्ह स्टोरी सांगितली.
असे जडले चव्हाणांचे प्रेम
७५-७६ मध्ये आम्ही दोघे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होतो़ अशोक चव्हाण सह्याद्रीमध्ये राहायचे़ त्याच्या पुढे जवळच आमचे घर होते़ त्यांचा प्रामाणिकपणा, दिलेल्या शब्दाला जागण्याचा स्वभाव भावल्याचे सांगत त्यातूनच आम्ही एकत्रित आल्याच्या भावना अमिता चव्हाण यांनी व्यक्त केल्या़ आयुष्यात घडते ते विधीलिखीत असते, असे सांगत आज दोन मुलींसह चांगला संसार सुरू असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले़