यवतमाळमध्ये आजपासून साहित्याचा जागर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी करणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 07:23 IST2019-01-10T19:39:29+5:302019-01-11T07:23:58+5:30
वैशाली येडे या यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील रहिवासी आहेत, त्यांना दोन मुले असून त्यांची तीन एकर शेतीही आहे.

यवतमाळमध्ये आजपासून साहित्याचा जागर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी करणार उद्घाटन
यवतमाळ : अनेक नाट्यपूर्ण घडामोडीनंतर अखेर ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर (ता. कळंब) येथील वैशाली सुधाकर येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला मिळाला. संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने यानिमित्ताने अभूतपूर्व असा ‘महिला योग’ जुळून आला आहे.
येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत शुक्रवारी दुपारी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमपत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची नावे असली तरी ते दोघेही उद्घाटनाला उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी दिली.
अ. भा. साहित्य महामंडळाने आपल्या घटनेत महत्त्वाचा बदल करून प्रथमच निवडणूक न घेता संमेनाध्यक्ष म्हणून प्रख्यात साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड केली. उद्घाटक म्हणून ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांची निवड करून अत्यंत सुखद पाऊल उचलले होते. मात्र निमंत्रण पत्रिका वाटप केल्यानंतर सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याने मोठा वाद उफाळला. चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिला. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली. संमेलनाच्या आदल्या दिवशी गुरुवारी यवतमाळात महामंडळाने बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला. आयोजकांनी उद्घाटक म्हणून वैशाली सुधाकर येंडे यांचे नाव जाहीर केले. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात होत असलेल्या या संमेलनात उद्घाटक म्हणून एका शेतकरी महिलेलाच स्थान दिल्याने उद्घाटन सोहळ्यावारील वादाचे मळभ काहीसे दूर झालेले असले तरी ते पूर्णपणे पुसलेले नाही.
अचानक निवडलेल्या वैशाली येडे आहेत कोण?
वैशाली येडे या कळंब तालुक्यातील राजूर या गावाच्या रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यांच्याकडे सध्या तीन एकर कोरडवाहू शेती आहे. तसेच गावातील अंगणवाडीत मदतनीस म्हणून त्या काम करतात. श्याम पेठकर लिखित आणि हरिष इथापे दिग्दर्शित ‘तेरवं’ या नाटकातही वैशाली येडे काम करतात. विशेष म्हणजे, हे नाटक त्यांच्याच जीवनकहाणीवर आधारित आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी या नाटकात काम करत आहेत. हरीश इथापे यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे.