रावते साहेब एकदा लाल परीची अवस्था बघा तरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 14:03 IST2019-09-17T13:46:12+5:302019-09-17T14:03:03+5:30
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात एसटी बस मधून प्रवासी उतरण्यासाठी दरवाजा खोलला असता तो पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे.

रावते साहेब एकदा लाल परीची अवस्था बघा तरी
मुंबई - सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीचं आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे एसटी आधीच खिळखिळी झाली आहे. त्यात आता महामंडळाच्या दुर्लक्षाची भर पडली आहे. असाच काही प्रकार औरंगाबादच्या वैजापूरमध्ये पाहायला मिळाला. एसटी बसचा दरवाजा उखडून पडला असताना सुद्धा त्याला तडजोड करून धोकादायक प्रवास सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकदा हा व्हिडिओ बघावाचं अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात एसटी बस मधून प्रवासी उतरण्यासाठी दरवाजा खोलला असता तो पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे. धावत्या प्रवासात हा दरवाजा कोणत्याही क्षणी निखळून पडण्याची भीती असताना सुद्धा त्यातून नेहमीप्रमाणे प्रवास सुरु असल्याचे दिसत आहे. वैजापूर येथील हा व्हिडिओ असून, सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
गेल्यावर्षी पंढरपुरात धावत्या बसचा दरवाजा निखळून रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या अंगावर पडला. सुदैवाने दुखापत गंभीर नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. मात्र असे असतानाही अजूनही एसटी महामंडळाने यातून धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. तुटलेला दरवाज्याला तडजोड करून थेट प्रवास करणाऱ्या वाहक आणि बस चालकावर सोशल मीडियामध्ये मोठी टीका होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.