Vaccines from six more companies will be available says Rajesh Tope | आणखी सहा कंपन्यांच्या लस येणार - राजेश टोपे 

आणखी सहा कंपन्यांच्या लस येणार - राजेश टोपे 

जालना : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसींना केंद्र शासनाने मान्यता दिल्याने आज लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, आणखी सहा कंपन्यांच्या लसही तयार होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील दोन-तीन महिन्यात त्या लसींची चाचणी आणि मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या लसींना मान्यता मिळाली तर बाजारपेठेत लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या कंपन्यांच्या लसींचा राज्यांना पुरवठा केला जाणार असून, लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेत असल्याची माहिती राज्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालना येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. कोरोना नियंत्रणासाठी असलेल्या लसीची प्रतीक्षा संपली असून, देशभरात दोन लसी आज आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत. कोविन अ‍ॅपवर आठ लाख जणांची नोंदणी झाली आहे. एकाला दोन वेळेस लस द्यावी लागणार आहे. त्या अनुषंगाने १७ लाख ५० हजार डोसची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. आजवर ६० टक्के लसीचा पुरवठा झाला आहे. उर्वरित पुरवठाही लवकरच होईल, असे टोपे म्हणाले. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत लस मिळावी, ही आमची इच्छा आहे. त्यादृष्टीने केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पद्मजा सराफ यांना दिली पहिली लस - 
जालना जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा सराफ यांना प्रथम लस देण्यात आली. त्यानंतर कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय जगताप,  मेट्रन ज्योती मुरकुटे, रुग्णवाहिका चालक अमोल काळे यांना लस देऊन या लसीकरणास सुरुवात करण्यात आली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vaccines from six more companies will be available says Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.