NCP Uttam Jankar: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांवर संशयाची सुई आहे. खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच बीड जिल्ह्यात कृष्णकृत्य करत असल्याचा आरोप विविध नेत्यांकडून करण्यात आला. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला असून यावेळी टीका करताना जानकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर जानकर म्हणाले की, "धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची वेळ का येत आहे? हे राज्य अत्यंत नैतिक होतं. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांनी एक चुकीचा शब्द गेला म्हणून नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिलेला होता. धनंजय मुंडे यांनी तर रानबाजार मांडला आहे. यांच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप आहेत. स्त्री वेश्या असल्याचं आपण पाहिलं आहे, मात्र पुरुष वेश्या असल्याचं दिसत आहे," असं जानकर यांनी म्हटलं आहे.
अशा पद्धतीचे मंत्री असतील आणि अजित पवार हे त्यांना सोबत घेऊन राज्य चालवत असतील तर या राज्याने यातून काय घ्यायचं, असाही सवाल उत्तम जानकर यांनी विचारला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधल्याची माहिती आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाला तपासाबाबत आदेश द्यावेत आणि बीडसह राज्यातील विविध ठिकाणी उद्योगांना खंडणी मागणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.