ज्यूससाठी फळांऐवजी रंग, स्वादाचा वापर
By Admin | Updated: April 28, 2016 03:48 IST2016-04-28T03:48:22+5:302016-04-28T03:48:22+5:30
शीतपेय, फळांचा ज्यूस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळेविक्रत्यांनी सध्या शहरात ठिकठिकाणी ठाण मांडले आहे.

ज्यूससाठी फळांऐवजी रंग, स्वादाचा वापर
आकाश गायकवाड,
डोंबिवली-शीतपेय, फळांचा ज्यूस, लिंबू सरबत, बर्फाचे गोळेविक्रत्यांनी सध्या शहरात ठिकठिकाणी ठाण मांडले आहे. आंबा, सफरचंद, अननस, चिकू, खरबूज आदी फळांचा ज्यूस ते १० रुपयांत विकत आहेत. त्यामुळे तेथे ग्राहकांची गर्दी होत आहे. परंतु,ज्यूससाठी फळांऐवजी रंग आणि स्वादाचा वापर होत आहे. त्याचेप्रमाण अधिक असल्याचे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाचे अशा विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
वाढत्या तापामानामुळे लाहीलाही होत आहे. त्यावर मात करण्यासाठी थंड पेये व पदार्थांना मोठी मागणी आहे. सध्या शहरातील चौकाचौकांतील आणि रेल्वेस्थानका बाहेरील हातगाडीचालकांकडे १० ते १५ रुपयांत ज्यूस विकत आहेत. घशाची कोरड भागवण्यासाठी नागरिक हमखास फळांचे रस, गोळा सरबत आणि लिंबू सरबत त्यांच्याकडे पिताना दिसतात. नागरिकही ‘स्वस्त आणि मस्त’ असा विचार करून आर्वजून या सरबतांचा आस्वाद घेतात. मात्र, सरबतासाठी वापरले जाणारे पाणी शौचालय, अन्य ठिकाणच्या दूषित पाण्याचा अथवा बोअरवलचा वापर केला जात आहे. तसेच साखरेपेक्षाही कैक पटींनी गोड असणाऱ्या सॅक्रि नच्या द्रव्याचा वापर सरबत गोड बनवण्यासाठी केला जातो. सरबतासाठी वापरला जाणारा बर्फतर घाणीत कुठेही ठेवला जातो. त्यामुळे बोअरवेलच्या किंवा दूषित पाण्याची चव अथवा रंग समजत नाही.
कधीकधी सरबत बनवण्यासाठी लागणारे लिंबू निकृष्ट दर्जाचे, डागळलेले आणि खराबही असतात. ज्यूस रंग आणि रसायनयुक्त स्वाद वापरला जातो. कारण ज्यूसविक्रेते कधीही प्रत्यक्षात फळे वापरताना दिसत नाहीत. त्यांच्या मिक्सरमध्ये अगोदरच दूध व त्यात फळाचा स्वाद व रंग टाकून कृत्रिम ज्यूस बनवून ठेवला जातो. फळांचा अर्कलागावा म्हणून खरबूज किंवा कलिंगडाचे तुकडे त्यात टाकले जातात.
आंब्याचा हंगाम असला तरी बाजारात पुरेशी आवक झालेली नाही. त्यामुळे एक डझन आंबे किमान ४०० ते ५०० रुपयांना मिळत आहेत. मग १० ते १५ रुपयांत ज्यूस विकण्यासाठी विक्रेते खरबुजाचा वापर करतात. त्यात आंबा आणि अन्य फळांचा स्वाद टाकतात. परंतु, दूषित पाणी आणि हानिकारक रसायनांमुळे ज्यूस प्यायल्यास गॅस्ट्रो, कावीळ, डायरिया, टायफॉइड, यासांरख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशा हातगाड्यांवर ज्यूस व लिंबू सरबत आवडीने पिणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी.