ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 08:24 IST2025-07-28T08:17:59+5:302025-07-28T08:24:21+5:30

Maharashtra Politics: मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे-उद्धवसेना एकत्रित आल्याची घोषणा केव्हा होणार आणि त्यानंतर काय रणनीती ठरवायची, याकडे आयाराम-गयारामांचे लक्ष लागले आहे.

upcoming mumbai municipal elections raj thackeray and uddhav thackeray alliance talks heat up again thackeray brothers meet joining party members get on hold | ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

Maharashtra Politics: हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवत विजयोत्सव साजरा करण्यासाठी वरळी येथे एकत्र येऊन गळाभेट घेतलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी थेट मातोश्रीवर पोहोचले. अनेक वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर आल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. परंतु, ५ जूननंतर लगेचच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे बंधूंची ही वाढती जवळीक दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी ठरली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते एकत्र येणार काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य असलेल्या खोलीत गेले. बाळासाहेबांच्या आसनापुढे नतमस्तक झाले. दोन्ही भावांत यावेळी २० मिनिटे चर्चा झाली. यानंतर आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावल्याचे सांगितले जात आहे.

पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

मुंबई महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होताच सुरवातीला इतर पक्षातील अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेवारांच्या रांगा शिंदेगटातील पक्षप्रवेशासाठी वाढल्याचे दिसत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे पक्षप्रवेश थंडावल्याचे चित्र आहे. राज आणि उद्धव यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चामुळे या प्रवेशांना ओहोटी लागल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे-उद्धवसेना एकत्रित आल्याची घोषणा केव्हा होणार, आणि त्यानंतर काय रणनीती ठरवायची, याकडे आयाराम-गयारामांचे लक्ष लागले आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे. 

दरम्यान, हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी वरळी येथे ५ जून रोजी मेळाव्यात उद्धव व राज दोन दशकांनंतर एकत्र आले होते. त्याला दीड महिन्याहून जास्त काळ लोटल्यानंतर हा योग आला. तत्पूर्वी, काही वर्षांपूर्वी उद्धव यांना हृदयासंबंधीचा त्रास जाणवल्यामुळे राज यांनी त्यांचा दौरा अर्धवट सोडत लीलावती रुग्णालय गाठले होते. त्यावेळी स्वतः गाडीचे सारथ्य करत राज यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीपर्यंत आणले होते. हा अपवाद वगळता शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर कधीच गेले नव्हते.

 

Web Title: upcoming mumbai municipal elections raj thackeray and uddhav thackeray alliance talks heat up again thackeray brothers meet joining party members get on hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.