अकोल्याचे दुग्धोत्पादन घटले!
By Admin | Updated: June 8, 2014 00:02 IST2014-06-07T22:32:46+5:302014-06-08T00:02:18+5:30
वर्ध्याचे दूध अकोलाऐवजी चालले मुंबईला

अकोल्याचे दुग्धोत्पादन घटले!
अकोला : जिल्ह्यातील दुधाची गरज भागविण्यासाठी वर्धा येथील शासकीय दूध योजनेकडे दुधाची मागणी करण्यात आली; परंतु वर्धा येथील दूध अकोल्याला न देता ते थेट मुंबईला पाठविले जात असल्याचे वृत्त आहे. यामुळे अकोलेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अकोला जिल्ह्याला दररोज तीन लाख लीटरपेक्षा अधिक दुधाची आवश्यकता आहे; परंतु तेवढे दुधाचे उत्पादन येथे होत नसल्यामुळे इतर जिल्ह्यातील खासगी कंपन्यांचे दूध या जिल्ह्यात विकले जात आहे. येथे शासकीय दूध योजना आहे. या योजनेतून शुद्ध दुधाचा पुरवठा शहरात केला जातो. या योजनेकडे ३० एप्रिलपर्यंत जवळपास चार ते साडेचार हजार दुधाची आवक होती; परंतु मे महिन्यात अचानक दुधाचे संकलन घटले आहे. यामुळे चार हजार लीटर दूध जेथे मिळत होते, ते आता एक हजार लीटरपेक्षा कमी मिळत आहे. या शुद्ध दुधाचा पुरवठा कमी झाला आणि या ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजून खासगी कंपन्यांचे दूध खरेदी करावे लागत आहे. काही खासगी कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळीचे प्रमाण आढळून आल्यामुळे ग्राहकांना शासकीय दूध योजनेचे दूध मिळावे, अशी अपेक्षा आहे.
अकोलेकरांची दुधाची गरज भागविण्यासाठी या दूध योजनेच्या अधिकार्यांनी वर्धा येथील शासकीय दूध योजनेकडे दुधाची मागणी केली होती. त्यानुसार १० हजार लीटर दुधाचा एक टँकर अकोल्याला आणण्यात आला होता. तथापि एक दिवस टॅँकर आला, त्यानंतर मात्र दूध घेऊन येणारा टँकर बंद झाला आहे. वर्धा येथील दुधाचा टॅँकर आता नांदेड मार्गे मुंबईला पाठविला जात असल्याचे वृत्त आहे. नांदेड मार्गे मुंबईला दूध पाठविणे म्हणजे वाहतुकीचा खर्च वाढलाच पण असे असताना व अकोल्याला दुधाची गरज असताना वर्ध्याचे दूध मुंबईला जात असल्याने अकोलेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.