Ramdas Athawale: “राज ठाकरेंना राजकारणात यश मिळत नाही म्हणून अशी भूमिका घेतायत”: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 18:10 IST2022-04-19T18:08:33+5:302022-04-19T18:10:23+5:30
राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची गरज नसून, त्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athawale: “राज ठाकरेंना राजकारणात यश मिळत नाही म्हणून अशी भूमिका घेतायत”: रामदास आठवले
नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या ठाम भूमिकेचे अद्यापही राज्यातील राजकारणात पडसाद उमटताना दिसत आहेत. यावरून रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांनी राजकारणात यश मिळत नाही म्हणून ते अशी भूमिका घेत आहेत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
एका धर्माने दुसऱ्या धर्माचा अपमान करू नये, असे सांगत मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची गरज नाही. राज ठाकरे यांनी उलट सुलट बोलणे बंद केले पाहिजे. सुरक्षेबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, असे रामदास आठवले म्हणाले. तसेच राज ठाकरेंनी त्यांची भूमिका बदलेली आहे. त्यांच्या झेंड्यामध्ये विविध रंग होते. पण त्यांनी आता एकदम कठोर भूमिका घेतली आहे. या कठोर भूमिकेमुळे त्यांना काही राजकीय फायदा होणार नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू नये
राज ठाकरे यांनी धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करू नये. हवे असल्यास ते मंदिरात भोंगे लावू शकतात पण मशिदींमधून ते हटवण्याची मागणी करू नये, असे आठवले म्हणाले. आपल्या देशात लोकशाही आहे. भारतातील मुस्लीम पूर्वी हिंदू होते. त्यामुळे एक दुसऱ्यांच्या धर्मचा आदर करावा. प्रत्येक पक्षाची मुस्लीम विंग आहे, त्यामुळे भोंगे काढायला लावणे योग्य नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींतील भोंगे हटवण्याची मागणी लावून धरली आहे. ठाकरे सरकारला अल्टिमेटमही देण्यात आले आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा कुणी प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण तयारीत असल्याचे म्हटले असून, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी कृती कुणी करू नये. अशी कृती कुणी केल्यास मग ती संघटना असो वा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई होईलच, असा इशारा वळसे पाटील यांनी दिला आहे.