“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 15:34 IST2025-12-13T15:31:25+5:302025-12-13T15:34:31+5:30
Union Minister Nitin Gadkari Vidhan Parishad News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेतील प्रदीर्घ संसदीय प्रवासाला उजाळा देताना या सभागृहाचे वेगळेपण अधोरेखित केले.

“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Union Minister Nitin Gadkari Vidhan Parishad News: भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या ऐतिहासिक सभागृहाच्या शंभर वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कायदे, ठराव व धोरणांचा दस्तऐवज म्हणून संदर्भसमृद्ध द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन विधानपरिषद सभागृहात करण्यात आले. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे” या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला हा द्वितीय ग्रंथ लोकशाहीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचे दस्तऐवजीकरण करणारा ठरणार आहे. भविष्यातील लोकप्रतिनिधी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट
ज्या सभागृहाने १८ वर्ष शिकवीत अनुभवसंपन्न केले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली, अशा सभागृहात कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा येण्याचे भाग्य मिळाले. त्यामुळे या सभागृहातील आठवणींना उजाळा मिळाला. चर्चेद्वारे समोरच्याकडून राज्याच्या विकासासाठी हवे असलेले काढून घेण्याचे कौशल्य याच सभागृहाने दिले. विधान परिषद सभागृहात कायदा निर्मितीवर झालेल्या चर्चेतून परिणामकारक कायद्यांची निर्मिती झाली आहे. या सभागृहात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना नियमांची लढाई झाली तरी कधी वैयक्तिक संबंधांमध्ये कटूता आली नाही, हीच आपल्या लोकशाहीची समृद्ध परंपरा आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र विधानपरिषदेतील प्रदीर्घ संसदीय प्रवासाला उजाळा देताना या सभागृहाचे वेगळेपण अधोरेखित केले. विधानपरिषद हे केवळ नियमांवर चालणारे सभागृह नसून, प्रथा, परंपरा, मूल्ये आणि विचारप्रवर्तक चर्चांवर चालणारे वरिष्ठ सभागृह असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना पाणीप्राधान्य, सिंचन, वाहतूक, विदर्भ-मराठवाडा अनुशेष, इथेनॉल धोरण यांसारख्या विषयांवर सातत्याने चर्चा घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक वेळा प्रश्न, लक्षवेधी व नियमांच्या आधारे सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले गेले आणि त्यामुळे सामान्य जनतेच्या हिताचे धोरणात्मक बदल घडू शकले, असा अनुभव त्यांनी मांडला. सभागृहातील तीव्र वादविवाद असूनही वैयक्तिक कटुता न ठेवता लोकशाही मूल्यांचे पालन ही महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेची मोठी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भूतकाळातील चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे भविष्यातील लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल, असे सांगत या ग्रंथाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.