Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:24 IST2022-07-27T15:22:58+5:302022-07-27T15:24:08+5:30
Maharashtra Political Crisis: बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. कुठे बाळासाहेब आणि उद्धव कुठे, अशी खोचक टीका केंद्रातील भाजप नेत्याने केली आहे.

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये”
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठेच भगदाड पडले आहे. पक्ष वाचवण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आता कंबर कसली आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यानंतर आता भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरेंना आरोप करायचे असतील, तर लोकांसमोर जावं, जाहीर भाषण करून करावेत. संजय राऊतांना मुलाखत द्यायची असेल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची घेतली पाहिजे. बंद खोलीत मुलाखत घेतात आणि काहीही बेछूट आरोप करतात. हे आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेनेने भाजपाशी जो दगाफटका केला त्यातून सावरण्यासाठी अशाप्रकारे आरोप केले जात आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी लगावला आहे.
पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे
पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे. हेच म्हणत होते पंतप्रधान उद्धव ठाकरे बनतील. उद्धव ठाकरे काय बोलतात त्यावर भाजप चालत नाही. उद्धव ठाकरे निराश झाले आहेत. ते आज काय बोलतात, हे उद्या त्यांच्या लक्षात राहत नाही. आम्ही काय करावं, कुठला निर्णय घ्यावा ते आम्हाला सांगू नये. तुम्ही दोघं कोण हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मुलाखत फडणवीस-राज आणि शिंदेंची या सगळ्यांची घ्यावी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंना विचारावी असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही
एकनाथ शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणतात मग २०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला ते दिसलं नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन असं वचन दिलं सांगता पण स्वत:चा सार्थ साधत दिलेला शब्द पाळला नाही. सध्या उद्धव ठाकरे नैराश्य झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. बाळासाहेब कुठे आणि उद्धव कुठे असाही खोचक टीका दानवेंनी केली.
दरम्यान, ‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती. त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. मला चिंता आहे ती मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.