शिंदेच्या नेतृत्त्वात आगामी निवडणुकीत ५० चे १०० आमदार होतील; उदय सामंत यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 19:18 IST2022-08-02T19:14:31+5:302022-08-02T19:18:25+5:30
Uday Samant : मुख्यमंत्री केवळ रत्नागिरीत येत आहेत असे नाही, हा त्यांचा संघटानात्मक दौरा आहे. प्रत्येकाला स्वत:चा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला मॉरल सपोर्ट देण्याची भूमिका असते, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

शिंदेच्या नेतृत्त्वात आगामी निवडणुकीत ५० चे १०० आमदार होतील; उदय सामंत यांचा दावा
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आज आमचे ५० आमदार आहेत, ते पुढच्या विधानसभेला १०० होतील, असा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनता स्वंयस्फूर्तीने एकनाथ शिंदे यांना भेटायला येत असते. या सर्वांची प्रचिती महाराष्ट्राच्या विकासात दिसेल. तसेच, मुख्यमंत्री केवळ रत्नागिरीत येत आहेत असे नाही, हा त्यांचा संघटानात्मक दौरा आहे. प्रत्येकाला स्वत:चा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला मॉरल सपोर्ट देण्याची भूमिका असते, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी संघटना वाढीसाठी वक्तव्ये केली असतील, अनेकदा अशी वक्तव्ये चोवीस तासात बदलली आहेत. हे आपण पाहिले आहे. त्याचप्रमाणे जर जे.पी. नड्डा यांनी अशी वक्तव्ये केली असतील तर त्यांच्या पक्षापुरती मर्यादित आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे ५० चे १०० आमदार होतील, अशी आम्हाला खात्री आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
याचबरोबर, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात मीही सामील झालो. शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला. पण विनायक राऊत यांना ते मान्य नाही. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका असावी, पण मी त्याचा राग मानत नाही. आश्चर्य याचे वाटतं की जे लोक विनायक राऊतांचा निवडणुकीत पराभव होण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांनीही काल व्यासपीठावर निष्ठा व्यक्त केली, असे उदय सामंत म्हणाले.
याशिवाय, विनायक राऊत यांनाही मला काही बोलायचं नाही. पण आजही मी शिवसेनेतच आहे. त्यामुळे मी कोणाच्या टीकेला उत्तर देणार नाही. मला राऊत साहेबांनी अनेकदा मदत केली आहे. ते मी कधीच विसरणार नाही, असेही उदय सामंत यांनी सांगितले. तसेच, विनायक राऊत यांचा गैरसमजही काही दिवसात दूर होईल, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.