उल्हासनगर शहराच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त इतिहासिक कोनशीलेचे पूजन अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, धीरज चव्हाण, जनसंपर्क प्रमुख अजय साबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारीया, महेश सुखरामनी यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी, कॉलेजचे तरुण उपस्थित होते. महापालिका आयुक्तासह अन्य पक्ष नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली आहे.
देशाच्या फाळणीनंतर सन- १९४७ ते १९४९ या काळात जवळपास १ लाखांहून अधिक सिंधी निर्वासित कल्याण येथील ब्रिटिशकालीन लष्करी चावणीत स्थलांतरित झाले. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु !” असा संदेश लिहलेल्या कोनशिलेचा सोमवारी ८ ऑगस्ट १९४९ रोजी देशाचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या हस्ते अनावरण झाले आणि उल्हासनगर शहराची पायाभरणी झाली. शुक्रवारी ७६ वा वर्धापन दिवस साजरा करणाऱ्या उल्हासनगरचे नाव राज्यात नव्हेतर देशात प्रसिद्ध आहे. मात्र आज शहरांची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. सर्वत्र रस्ते खोदले असून शेकडो कोटीच्या योजना राबवूनही पाणी टंचाई, साफसफाई, डम्पिंग ग्राउंड, अवैध बांधकामे, धोकादायक इमारती व रस्त्याची दुरावस्था कायम आहे.
शहराची स्थापना झाल्यानंतर सुरवातीला सिंधी समाजाने अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांचा अभाव होता. मात्र या समाजाकडे उद्योजकतेची प्रेरणा होती. यातूनच त्यांनी शहराला नामांकित बाजारपेठेची ओळख करून दिली. सकाळी ९ वाजता वर्धापन दिनानिमित्त इतिहासिक कोनशीलेचे पूजन करून, रॅली काढण्यात आली. रॅलीतील सहभाग व कोणाशीलेच्या दर्शनासाठी यापूर्वी सर्वच पक्ष नेत्यात व सामाजिक कार्यकर्त्यांत चढाओढ असायची. मात्र यावेळी स्थानिक आमदार, महापालिका आयुक्त, सर्वच पक्षाचे प्रमुख नेते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, उघोगपती, नामांकित व्यक्तीनी पाठ फिरविली. आमदार कुमार आयलानी यांनी मात्र पक्षाच्या काही नेत्यासह रॅलीत हजेरी लावली. एकूणची वर्धापन दिनावर अघोषित बहिष्कार टाकल्याचे चित्र होते.
कॉलेजचे तरुण रॅलीत सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दायमा, काजल मुलचंदानी यांनी वेदांत व एसएसटी कॉलेजचे मुले रॅली व कोनशीला कार्यक्रमात सहभागी करून शोभा वाढविली.
कोनशीला हलविण्याची मागणी शहर स्थापनेची इतिहासिक कोनशीला तरण तलवाच्या एका कोपऱ्यात अडगळीत पडली. कोणाशीलेची मान व शान राहण्यासाठी महापालिका मुख्यालयात समोर बसाविण्याची मागणी होत आहे.