Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
By सदानंद नाईक | Updated: May 20, 2025 18:22 IST2025-05-20T18:21:22+5:302025-05-20T18:22:25+5:30
Ulhasnagar Police: शहरातील प्रत्येक घडामोडीवर वॉच राहणार असून नशेखोर, भुरटे चोर आदी गुन्हेगारांचे यामुळे धाबे दणाणले आहे.

Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील घडामोडीवर वॉच ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून तब्बल ९८५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम फास्ट ट्रकवर सुरु आहे. सीसीटिव्ही कॅमेऱ्यामुळे शहरातील प्रत्येक घडामोडीवर वॉच राहणार असून नशेखोर, भुरटे चोर आदी गुन्हेगारांचे यामुळे धाबे दणाणले आहे.
शहरातील गुन्हेगारी घटनेसह अन्य घडामोडीवर वॉच ठेवण्यासाठी वर्दळीचे ठिकाण, चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, रुग्णालये आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी यापूर्वी होत होती. गेल्या वर्षी शहरांत सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यासाठी पोलीस विभागाने, महापालिकेला परवानगी मागितली असून महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी तात्काळ परवानगी दिली होती. कॅमेऱ्यासाठी अंडरग्राऊंड केबल वायरी टाकण्याकरिता व पोल बसवण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशान्वये बिनतारी संदेश विभागाचे (वायरलेस) सहायक पोलिस आयुक्त प्रदीप कन्नलू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद बिरारे यांच्या देखरेखीखाली ३९८ पोलवर ५९८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू करण्यात आले.
उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कॅमेरे लागणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे हे संवेदनशील भाग, गुन्हेगारी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि विविध वादग्रस्त घडामोडींवर २४ तास वॉच ठेवणार आहेत. कॅमेऱ्याचे पोल लावण्यासाठी व केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आल्याने, सुरवातीला नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र पोलला कॅमेरे लागताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सीसीटीव्ही कॅमेरांचे दोन कंट्रोल रूम
शहरांत लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याऱ्यांचे दोन कंट्रोल रूम सज्ज करण्यात येत आहे. महापालिका मुख्यालय व पोलीस नियंत्रण कक्ष याठिकाणी कंट्रोल रूम राहणार असून २४ तास पोलिस ऍक्टिव्ह राहणार आहे. शहरांत घडणारी कोणतीही घटना कॅमेऱ्यात टिपली जाणार असून पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडवर येणार आहे. असे मत पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी व्यक्त केले.