Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत

By सदानंद नाईक | Updated: June 15, 2025 06:43 IST2025-06-15T06:43:01+5:302025-06-15T06:43:44+5:30

Ulhasnagar Hospital News: नातेवाइकांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाला घरी नेऊन अंत्यविधीची तयारी सुरू केली असता त्याने हालचाल केली आणि मग...

Ulhasnagar Elderly Man Mistakenly Declared Dead  | Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत

Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत

सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: कॅम्प नं-४ येथील शिवनेरी रुग्णालयाचे डॉ. प्रभू आहुजा यांनी एका बेशुद्ध रुग्णाला रुग्णालयाबाहेरच रिक्षात तपासून चक्क मृत घोषित केले. त्याच्या मृत्युचा दाखलाही दिला. नातेवाइकांनी त्याला घरी नेऊन अंत्यविधीची तयारी सुरू केली असता, त्याने हालचाल केली. त्याच्यावर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार केले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्याने नातेवाईकांसह जेवणही घेतले. रुग्णाला घाईघाईत मृत घोषित करण्याच्या खासगी रुग्णालयाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.   

अभिमान तायडे हे कर्करुग्ण आहेत. त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना १५ दिवसांपूर्वी घरी आणले होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना रिक्षातून बेशुद्ध अवस्थेत शिवनेरी रुग्णालयात आणले. यावेळी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. आहुजा यांनी सकाळी साडेआठ वाजता रुग्णालयाबाहेर रिक्षातच तायडे यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. तसेच मृत्यू प्रमाणपत्रही दिले. तायडे यांना घरी आणून अंत्यविधीची तयारी नातेवाइकांनी सुरू केली असता त्यांनी हालचाल केली. त्यामुळे त्यांना क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले. 

क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाल्यानंतर काही वेळात त्यांना बरे वाटले. नातेवाइकांनी शिवनेरी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर नाराजी व्यक्त केली. शिवनेरी रुग्णालय जुने आहेत. अनेक राजकीय  नेते आणि त्यांचे कुटुंबीय याच रुग्णालयात उपचार घेतात, असे  सांगितले जाते.

अभिमान तायडे यांना बेशुद्धावस्थेत रिक्षाने आणले होते. रिक्षात त्यांची तपासणी केली आणि त्यांना व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णालयात त्वरित नेण्यास नातेवाइकांना सुचवले. त्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात येऊन तायडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र मागितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून मृत्यू प्रमाणपत्र दिले, ही माझी चूक आहे. मृत्यू प्रमाणपत्र दिल्यानंतर नातेवाइकांनी बेशुद्ध रुग्णास दुसऱ्या रुग्णालयात नेले, अशी माहिती शिवनेरी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रभू आहुजा यांनी दिली.

Web Title: Ulhasnagar Elderly Man Mistakenly Declared Dead