Uddhav Thackeray : "प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणत भाजपाला तडीपार करा"; उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 21:39 IST2023-05-06T21:24:08+5:302023-05-06T21:39:07+5:30
Uddhav Thackeray And BJP : "मी हिंदुत्व सोडले असा एक प्रसंग सांगा. हिंदुत्व काय हे मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय. भाजपचे हिंदुत्व काय आहे?"

Uddhav Thackeray : "प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणत भाजपाला तडीपार करा"; उद्धव ठाकरे कडाडले
उद्धव ठाकरे यांची आज महाड य़ेथे सभा झाली. शिंदे गट, भाजपा आणि मोदी सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणून भाजपाला तडीपार करा" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. "निवडणुकीत जनतेची मते मांडायला हवी. पण हे मन की बात करतात. २०१४ साली दिलेले आश्वासन काय होती? त्यावर कोणी विचारले की तुरूंगात टाकायचे."
"आज पंतप्रधान म्हणताहेत, मतदारांना बजरंगबली म्हणा, मग तुमचे बळ, ५६ इंच छाती कुठे आहे? यापुढील प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणून भाजपाला तडीपार करा. भारत माता की जय म्हटलं की ते देशप्रेमी होत नाही. सैनिकाकडे बुलेट, जनतेकडे बॅलेट. सत्यपाल मलिकांकडे सीबीआय. इतर पक्षातील लोकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
"मी हिंदुत्व सोडले असा एक प्रसंग सांगा. हिंदुत्व काय हे मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय. भाजपाचे हिंदुत्व काय आहे? गोमूत्रधारी. मेहबूबा मुफ्तीसोबत बसले, तुम्ही काय सोडले? भागवत मशिदीत गेले मी काही बोललो. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपाची भ्रष्टाचार, हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही. भाजपा आता भ्रष्ट जनता पार्टी झाली आहे."
"मेघालयात अमित शाह यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच सोबत सरकार स्थापन केले. पण साध्या माणसांवर धाडी टाकताय. कुठे आहे हिंदुत्व ? कुटुंब उदध्वस्त करायचे. मोदी व्यक्ती विरोधात नाही, वृत्ती विरोधात मी आहे. निवडणुका येतील जातील. पण २०२४ साली आपण ही वृत्ती गाडली नाही तर लोकशाही संपेल. तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या निवडणुका एकत्र लावा. तुम्ही मोदींचे नाव घेवून या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे