उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:44 IST2025-09-24T15:42:00+5:302025-09-24T15:44:47+5:30
Uddhav Thackeray Latest News: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती उद्भवली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू केली असून, आता उद्धव ठाकरेही नुकसान झालेल्या भागांना भेटी देणार आहेत.

उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
Uddhav Thackeray: मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या असून, प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने पूर परिस्थितीची पाहणी सुरू केली असून, शिवसेनेचे (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेहीपूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे पाच जिल्ह्यांतील परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणाऱ्या दौऱ्याबद्दलची माहिती दिली आहे.
२५ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे दिवसभरात पाच जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या गावांना भेटी देणार आहेत. सकाळी ११.३० वाजता लातूर जिल्ह्यातील काडगावला भेट देणार आहेत. त्यानंतर १२.३० वाजता धाराशिव जिल्ह्यातील इटकूर गावाला भेट देणार आहेत.
दुपारी १.३० वाजता धारशिव जिल्ह्यातील पारगावात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यातील कुर्ला गावाला ३.३० वाजता भेट देणार आहेत. त्यानंतर ४.३० वाजता जालना जिल्ह्यातील महाकाळा गावातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सांयकाळी ५.३० वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रजापूर गावाला भेट देणार आहेत, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.
राज्यातील मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नद्यांना पूर आल्याने शेती, घरे, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरल्याने घरांचे आणि व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले आहे.