ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडणार! उदय सामंतांनी सांगितले शिंदेंकडे कोण-कोण येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:52 IST2025-02-12T17:49:51+5:302025-02-12T17:52:26+5:30
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. उदय सामंत यांनीच याबद्दलची अधिकृत माहिती दिली.

ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडणार! उदय सामंतांनी सांगितले शिंदेंकडे कोण-कोण येणार?
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा होत आहे. त्याचाच भाग म्हणून पहिला पक्षप्रवेश राजन साळवी यांचा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राजन साळवींना शिवसेनेत घेत शिंदेंनी ठाकरेंना पहिला झटका दिला आहे. आगामी काळात ठाकरेंना आणखी हादरे बसणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडण्याची चर्चा सुरू झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत म्हणाले, "एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानंतर राजन साळवी यांच्याशी माझी अनेकवेळा चर्चा झाली. पक्षामध्ये येण्याच्या संदर्भात. पंरतु काही अडचणींमुळे ते येऊ शकले नाहीत. त्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध युबीटीची लढत झाली. त्यात माझे मोठे बंधू किरण सामंत जिंकून आले. त्यानंतर माझी आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. एकनाथ शिंदे आणि किरण सामंत यांचीही चर्चा झाली होती."
"आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आजच रात्री मुंबईला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे एक बैठक आहे. त्या बैठकीत मी, राजन साळवी आणि किरण सामंत देखील असणार आहेत. मला असं वाटत की, जो निर्णय घ्यायचा आहे, तो बैठकीत निश्चित होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साळवींनी पक्षात येऊ नये म्हणून आम्ही खोडा घातल्याच्या बातम्या येत होत्या, त्या अतिशय चुकीच्या होत्या", असेही सामंत यावेळी म्हणाले.
ठाकरेंच्या शिवसेनेतून कोण-कोण येणार?
आगामी पक्षप्रवेशांबद्दल बोलताना उदय सामंत म्हणाले की, "मी गेल्या १० दिवसांपासून सांगतोय की, महाराष्ट्रातील आठ ते दहा माजी आमदार आणि शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार हे एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार आहेत. त्यातीलच हा एक भाग आहे. शिंदेसाहेबांसोबतच्या बैठकीत राजन साळवींना कशा पद्धतीने सामावून घ्यायला पाहिजे, यासंदर्भात चर्चा करू", अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
१५ तारखेला रत्नागिरीत मोठा मेळावा
पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, "15 तारखेला मोठा मेळावा एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरीमध्ये होणार आहे. त्याठिकाणी अगोदरच ठरलेलं आहे की, ठाकरेंच्या शिवसेनेचे काही माजी आमदार, काही माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, काही पदाधिकारी, काही संपर्कप्रमुख हे शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार आहेत. त्या अगोदर उद्या (१३ फेब्रुवारी) राजन साळवी यांचा प्रवेश होऊ शकतो."
"राजन साळवींनी आज राजीनामा दिला आहे. आज बैठकीत राजन साळवींचा पक्षप्रवेश उद्या किती वाजता करायचा? किंवा परवा करायचा यासंदर्भात उद्या सकाळी पत्रकार परिषद होईल", अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.