मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:46 IST2025-10-16T09:46:20+5:302025-10-16T09:46:49+5:30
मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असून, तो १७ ते २६ ऑक्टोबरदरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात आकर्षक रोषणाई आणि कंदिलांनी सजावट केली जाणार आहे. या दीपोत्सवाचे मुंबईकरांमध्ये, विशेषतः तरुण पिढीत आकर्षण आहे.

मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...
लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदान परिसरात मनसेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ज्या राजकीय पक्षाने या दीपोत्सवाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती, त्या उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेच यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.
मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असून, तो १७ ते २६ ऑक्टोबरदरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात आकर्षक रोषणाई आणि कंदिलांनी सजावट केली जाणार आहे. या दीपोत्सवाचे मुंबईकरांमध्ये, विशेषतः तरुण पिढीत आकर्षण आहे.
नेमके काय झाले होते गेल्या वर्षी?
गेल्या वर्षीचा दीपोत्सव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात येत होता. मनसेने या दीपोत्सवात काही ठिकाणी कंदिलांवर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह छापले, असा आक्षेप घेत उद्धवसेनेचे खा. अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार केली होती. या दीपोत्सवात मनसेचे माहीम विधानसभेचे तत्कालीन उमेदवार अमित राज ठाकरे उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा, अशी मागणी देसाई यांनी केली होती.
हिंदी सक्तीविरोधातील एकत्रित भूमिकेनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती होण्याच्या चर्चेलाही अधिक जोर मिळाला आहे. अलीकडेच गणेशोत्सव, वाढदिवस आणि कौटुंबिक भेटीतून जवळीकही दिसून आली असून, मतदार यादीतील घोळ या विषयावरही ठाकरे बंधूंनी पुढाकार घेतला आहे.