उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 09:05 IST2025-01-27T09:03:30+5:302025-01-27T09:05:26+5:30
आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक घेणार आहेत.

उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक घेणार!
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत मोठा धक्का बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आता मुंबईसह राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक घेणार आहेत.
सोमवारी मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यानंतर आता ठाण्याची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवण्यासंदर्भात ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची काय भूमिका असणार आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे मनोबल खचले आहे. मात्र, आपल्या शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. अशातच आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठकांचे सत्र सुरु केले आहे.
महापालिका निवडणुकांच्या तयारी लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या नेत्यांना महापालिका निवडणुकांची जबाबदारीही दिली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरदार सुरु केली आहे.