पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:42 IST2025-09-25T18:33:52+5:302025-09-25T18:42:55+5:30
मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
Uddhav Thackeray On Ajit Pawar: मराठवाड्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पुराने शेतजमिनी वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारकने कागदोपत्री अडथळे दूर करून सरसकट मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आहे. विरोधक ही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावा यासाठी सरकारला जाब विचारत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही मराठवाडा दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
मराठवाड्यात महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी आणि लोकांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे हे गुरुवारी धाराशिवच्या दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लातूर, धाराशिवसह अनेक भागातील नुकसानाची पाहणी केली. उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्तांची भेट घेऊन सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली.
"कोणीही न मागता मी कर्जमुक्ती केली. ते माझं कर्तव्य होतं. मी त्याची जाहिरात केली नाही. मी झाली ना कर्जमाफी मिळाली ना मदत असं म्हणत फिरलो नाही. कोणावर उपकार केल्याच्या भावनेतून फिरलो नाही. मी येताना गाडीतून बघितलं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत होते की लाडक्या बहिणींना ४५ हजार कोटी रुपये देतो. पैसे देता म्हणजे उपकार करता का? जेवढे तुम्ही पैसे देत आहात ते या घडीला उपयोगाचे आहेत का," असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
बँकांच्या नोटिसा मुख्यमंत्र्यांकडे पाठवा
"सध्या जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे. शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत. सगळ्या नोटिसा एकत्र करा आणि जवळच्या शिवसेना शाखेत नेऊन द्या पुढे काय करायचं ते आम्ही पाहतो. मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही कर्जमुक्ती केली होती ती आम्ही विसरलो नाही. मला काय मी काय केलं होतं त्याची जाहिरात करायची नाही. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची गरज आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.