मुंबई - कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पडसाद ठाकरे बंधू यांच्या युतीवरही झाले आहेत. हा स्थानिक विषय असल्याचं मनसेकडून सांगण्यात येते. परंतु या प्रकाराची गंभीर दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली असून राज ठाकरेही या निर्णयाने व्यथित आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणारेही बेईमान आहेत असा निशाणा राऊतांनी मनसे नेते राजू पाटील यांना लगावला.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही. सत्ता येते आणि जाते आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही. राज ठाकरेही नाहीत. कल्याण डोंबिवलीचा विषय समोर आला आहे. तो अत्यंत चिंताजनक आहे. हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असू शकेल परंतु पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करून स्थानिक नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पक्षाने तात्काळ निलंबित केले पाहिजे. स्थानिक पातळीवर विषय झाला हे सांगून हे संपत नाही. एखाद्या चिन्हावर निवडून येऊन जर बेडूक उड्या घेत असतील तर पक्ष नेतृत्वाने त्यावर कारवाई करून या भूमिकेशी सहमत नाही हे महाराष्ट्राला दाखवून दिले पाहिजे असं राऊतांनी म्हटलं.
तसेच मनसे म्हणजे एमआयएम आहे का असं शिंदेसेनेचे नेते बोलतात. पण आमच्यासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम आहे. मराठी माणसांमधील महाराष्ट्र द्रोही, बेईमान आहेत. काहींची व्यक्तिगत कारणे असू शकतात. ती तेवढ्या पुरती ठेवायला हवीत. काही लोकांच्या मागे ईडी आहे. त्यासाठी पक्ष वेठीस धरणे आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणे हे चुकीचे आहे. आज अनेक संकटे माझ्यावर आहेत. ईडीही माझ्या मागे आहे. मी जेलमध्येही जाऊन आलो परंतु पक्षाला वेठीस धरले नाही. कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरेंनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे असं संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, कल्याणमधील या निर्णयाने राज ठाकरेही व्यथित आहेत. ही माझ्या पक्षाची भूमिका नाही, हा स्थानिक निर्णय आहे असं राज ठाकरे यांनी सांगितले. जर स्थानिक नेतृत्वाने पक्षाच्या भूमिकेविरोधात जात निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राशी बेईमानी करणाऱ्या शिंदेंसोबत जर कुणी जात असेल तर त्यांनाही लोक बेईमान म्हणतील. शिंदेसोबत जाण्याची मोठी चूक मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे नगरसेवक भाजपासोबत गेले तर त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली. जर कुणी पक्षाच्या विरोधात जात भूमिका घेत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आमच्याही पक्षात जर कुणी पक्षाविरोधात भूमिका घेत असेल तर आम्ही त्यांना पक्षातून काढून टाकतो. विकासाच्या नावाखाली जर गद्दारांशी हातमिळवणी करत असेल तीदेखील एक गद्दारी आहे असं सांगत संजय राऊतांनी राजू पाटील यांच्यावर घणाघात केला.
पक्षांतर करणारे राजकीय मनोरुग्ण
काही मिळाले नाही तर सोडून जातो अशी मानसिकता काही लोकांमध्ये आहे. पक्षांतर करणे म्हणजे राजकीय मनोरुग्ण आहेत. मग शहराचा विकास, गावाचा विकास, जगाचा विकास या नावाखाली पक्षांतरे वाढत आहेत. पक्षांतर रोखणे हे न्यायालयाचे काम आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने आजही माती खाल्ली. देशाच्या ऱ्हासाला हात भार लावणे हे सर्वोच्च न्यायालय करत आहे. प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही. देण्याच्या स्थितीत नाही. मला आता पाहिजेच अन्यथा मी जातो या मानसिकतेत काही जण आहेत. हे मानसिक अस्थिरतेचे लक्षण आहे. मुंबईत असे होणार नाही. कल्याण डोंबिवलीत जे घडलं ते अत्यंत वाईट आहे. परंतु एक लक्षात घ्या, शेवटी महाराष्ट्राची सत्ता पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे. जर त्यांना हा निर्णय पटला नाही तर ज्या उदात्त हेतूने पाठिंब्याचे प्रकरण घडले आहे त्यांच्या मागे फार मोठा ससेमिरा लागू शकतो असं सूचक विधानही राऊतांनी राजू पाटील यांच्याबाबत केले आहे.
Web Summary : Sanjay Raut criticizes MNS's support to Shinde's Sena in KDMC, claiming Uddhav Thackeray and Raj Thackeray are upset. He warns of betrayal and potential action.
Web Summary : संजय राउत ने केडीएमसी में शिंदे सेना को मनसे के समर्थन की आलोचना की, कहा उद्धव ठाकरे और राज ठाकरे परेशान हैं। उन्होंने विश्वासघात और संभावित कार्रवाई की चेतावनी दी।