...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:49 IST2025-02-23T13:49:19+5:302025-02-23T13:49:57+5:30
माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे पण भाजपाच्या हिंदुत्वाची व्याखा काय हे तरी त्यांनी सांगावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला.

...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल
मुंबई - एकनाथ शिंदेंची शिवसेना नाही तर गद्दार सेना आहे. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचं रक्षण करणं म्हणजे तुमचं हिंदुत्व आहे का असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मातोश्रीवर काँग्रेसमधून बाहेर पडलेले अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी शिवसेना संपवली असं एकनाथ शिंदेंना वाटतं परंतु माझ्यासोबत माझी जुनी माणसं राज्यभरात आहे. उत्तर प्रदेशातही काही पदाधिकारी मशाल हाती घेऊन संघटनांसाठी बैठक घेतायेत तेदेखील माझ्यासोबत आहेत. आज किरण काळेसारखे लढवय्ये कार्यकर्ते आमच्यासोबत येत आहेत. राज्यात आणि देशात अंदाधुंद कारभार माजला आहे त्यांना दूर करून आपलं हिंदुत्व, राष्ट्रीयत्व करणे ही जबाबदारी आहे. निवडणूक काळात अनेक रेवड्या देऊन जनतेला फसवलं गेले आहे आता त्या रेवड्या उघड्या पडायला लागल्यात असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय धर्म जगायचा असतो, तो सांगायचा नसतो हे गाडगे महाराजांनी शिकवलं. ते मी मुख्यमंत्री काळात पाळलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही दुसऱ्या धर्माचा द्वेष करा हे शिकवले नाही. जे या देशाला आपलं मानतात ते आपलेच, ज्यांनी हा धर्माचा खेळखंडोबा केला आहे त्यांचं राजकारणापुरतं मुस्लीम प्रेम कसं आहे याचं मी दाखल्यासह सांगू शकतो. अगदी काल परवा मोदींचे थोरले की धाकटे बंधू हे कोण आहेत ते त्यांनी दाखवले आहे. त्यांच्याबद्दल फार प्रेमाने, आपुलकीने ट्विट केले आहे. निवडणुकीसाठी जी काही धर्मांधता माजवतायेत हे देशासाठी योग्य आहे असं मला वाटत नाही. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हे भाजपाचं हिंदुत्व आहे का? माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे पण भाजपाच्या हिंदुत्वाची व्याखा काय हे तरी त्यांनी सांगावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला.
दरम्यान, न्यायलयाने तत्परता दाखवणे गरजेचे आहे. आमच्या खटल्यात ३ वर्ष होऊन गेली तरी अद्याप निकाल लागला नाही. परंतु माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत निकाल लागलाय तर किमान त्याची प्रत तरी सन्माननीय राहुल नार्वेकरांना द्यावी अशी कुणी मागणी केली गैर काय..न्यायालयाच्या निर्णयाचा मान सन्मान राखत असतील तर त्यांनी आमच्याबाबतीत जो काही निर्णय दिला तो विचित्र आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मर्सिडीजमधून फिरणाऱ्यांनी लाडक्या बहिणींचे पैसे का दिले नाहीत?
एक महिला म्हणून त्यांचा आदर आहे. राजकारणात त्यांनी त्यांचे चांगभलं केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर फार बोलणार नाही मात्र स्वत: मर्सिडिजमधून फिरणाऱ्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे का दिले नाहीत हे सांगावे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या आरोपावर भाष्य केले. तर महिला आघाडीचा विरोध असताना उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंना ४ वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली, त्यांनी उद्धव ठाकरे यांना ८ मर्सिडीज दिल्या का याचे उत्तर द्यावे. त्या मर्सिडीज दिल्याचा पावत्या असतील तर त्या दाखवा असं आव्हान संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंना केले.