शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

शिवसेनेच्या मदतीने आजचे सुवर्णयुग अवतरले हे भाजपाने विसरु नये - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 17, 2017 07:47 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ज्या ३३ पक्षांना ‘ताट व पाट’ दिले त्या पक्षांबाबत तुमचे धोरण काय ?

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 17 - सर्वच राज्यांत भाजपचेच राज्य हवे हा संकल्प चांगला व प्रेरणादायी आहे. मग राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ज्या ३३ पक्षांना ‘ताट व पाट’ दिले त्या पक्षांबाबत तुमचे धोरण काय ? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भविष्यात पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत प्रत्येक स्तरावर सर्वत्र फक्त भाजपचीच सत्ता यायला हवी असे विधान केले. 
 
त्यांचे हे वक्तव्य शिवसेनेला अजिबात पटलेले नाही. मागच्या आठवडयात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत 2019 च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय झाला. स्वत: उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जी चर्चा झाली त्याच आधारावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ज्या ३३ पक्षांना ‘ताट व पाट’ दिले त्या पक्षांबाबत तुमचे धोरण काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे. 
 
शिवसेना, अकाली दल, तेलुगू देसमसारखे पक्ष आपापल्या राज्यात ताकदीने उभे आहेत. याच सर्व मित्रांच्या मदतीने आजचे सुवर्णयुग अवतरले आहे याची आठवण भाजपाला करुन दिली आहे. सत्तेत असो अगर नसो, शिवसेनेचा सुवर्णकाळ कधीच संपत नाही. सुवर्णकाळाचे निर्माते व साक्षीदार हे काळानुसार बदलत असतात असे शिवसेनेने म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- हिंदुस्थानात कधीकाळी सोन्याचा धूर निघत होता. त्याच देशात आता कोट्यवधी घरांतून चुलीचा धूरही निघत नाही हे वास्तव आहे. सरकारे येतात व जातात. परिस्थिती फारशी बदलत नाही. अशा आपल्या देशात सुवर्णयुग आणण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘‘आम्हाला केवळ भाजपचा विस्तार करायचा नसून हिंदुस्थानला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच दृष्टीने सक्षम बनवायचे हे आमचे प्रथम ध्येय आहे.’’ पंतप्रधानांनी व्यक्त केलेले हे विचार लाखमोलाचेच आहेत आणि हिंदुस्थानी जनतेच्या आशाआकांक्षा वाढविणारेच आहेत. मात्र पंतप्रधान देशाच्या सुवर्णयुगाचे स्वप्न पाहात असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याच बैठकीत बोलताना ‘‘भविष्यात पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत प्रत्येक स्तरावर सर्वत्र फक्त भाजपचीच सत्ता यायला हवी’’, असे ‘मार्गदर्शन’ कार्यकर्त्यांना केले. 
 
- पक्षाच्या बैठकीत, मेळाव्यात कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने असे बोलले जाते हे मान्य केले तरी पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या बोलण्यातील ‘स्वप्नभेदा’चा नेमका अर्थ जनतेने काय घ्यायचा हा प्रश्न उरतोच. म्हणजे पंतप्रधानांना देशात ‘सुवर्णयुग’ आणायचे आहे आणि भाजप अध्यक्षांना भाजपचे ‘सुवर्णयुग’ आणायचे आहे असे सामान्यांनी समजायचे का? पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख आहेत व अमित शहा हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपापल्या अखत्यारीतील सुवर्णकाळाच्या रेषा त्यांनी आखल्या आहेत. देशातील १३ राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा यापूर्वीच देण्यात आला आहे व त्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. ओडिशातील भाजप अध्यक्षाच्या भाषणाचा सूर तसाच आहे. पंतप्रधान मोदी यांनीही भुवनेश्वरच्या रस्त्यांवर शनिवारी भला मोठा रोड शो केला. ओडिशातील आगामी विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे. ओडिशात बिजू जनता दलाचे राज्य आहे व पटनाईक यांना पराभूत करण्याची रणनीती भुवनेश्वरला आखली गेली असेल.
 
-  उत्तर प्रदेशातील मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाचा अश्वमेध सुसाट निघाला आहे व त्यास अडविण्याचा प्रयत्न करणारे देशाचे शत्रू ठरवले जात आहेत. ‘शतप्रतिशत’चा विचार चांगला असला तरी लोकशाहीत विरोधी सूर काढणारे देशाचे शत्रू ठरवले जाऊ नयेत. अशाने लोकशाहीचा उरलासुरला डोलाराही कोसळून पडेल. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार असतोच, पण त्याचवेळी हिंदुस्थानसारख्या मोठ्या देशात संसदीय लोकशाही टिकविण्याची आणि विरोधी पक्षांना बळ देण्याची जबाबदारीही सत्ताधारी पक्षाची असते हेदेखील खरेच. सुवर्णकाळ हा एखाद्या पक्षाचा नव्हे तर देशाचा आणि राज्याचा यावा या मताचे आम्ही आहोत. मात्र फक्त सत्तासाधना व राजकीय विजय ही सुवर्णकाळाची पायरी ठरू शकत नाही. त्या अर्थाने आज भारतीय जनता पक्षाचा सुवर्णकाळ आलाच आहे. जग पादाक्रांत करायला निघालेल्या अलेक्झांडर द ग्रेट किंवा नेपोलियनलाही त्यांच्या राजकीय जीवनात सुवर्णकाळ आणता आला नव्हता. कारण त्यांचे राज्यविस्ताराचे स्वप्न हिंसाचार व रक्तपाताच्या पायावर उभे होते. 
 
- मोदी व शहा यांच्या नेतृत्वाखाली सध्या पक्षाची विजयी घोडदौड सुरू आहे व विजयप्राप्तीसाठी हे दोन्ही नेते प्रचंड मेहनत घेत आहेत, पण त्याच वेळेला कश्मीरातील हिंसाचार थांबलेला नाही. उलट सैनिकांवरील हल्ले वाढले आहेत. जम्मू-कश्मीरात भाजप-पीडीपीचे राज्य असतानाही श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत हिंसाचार उसळून त्यात आठजण ठार झाले. मतदान फक्त सात टक्केच झाले व फारूख अब्दुल्ला विजयी झाले. कश्मीरचे हे चित्र उत्साहवर्धक वगैरे आहे असे वाटत नाही. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यासाठी फासाचा दोर आवळायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात शेतकरी ‘सामुदायिक आत्महत्ये’चा मार्ग स्वीकारत आहेत. महागाई घटलेली नाही, बेरोजगारी कमी झालेली नाही. त्यामुळे देशाचा सुवर्णकाळ येण्याची अद्यापि सुरुवात झालेली नाही. 
 
- पुन्हा ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत केवळ भाजपचीच सत्ता हवी ही राजकीय महत्त्वाकांक्षा असली तरी आपल्या लोकशाहीत ती शंभर टक्के शक्य आहे काय? स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची काही वर्षे काँगेस पक्षाची एकपक्षीय राजवट देशात जरूर होती. पण तो आता इतिहास झाला. मागील चार दशकांपासून तर देशात आघाड्यांचेच राजकारण राहिले आहे. राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता असो, ते राज्य व तेथील प्रजा शेवटी हिंदुस्थानचीच आहे आणि त्यांच्या विकासासाठी केंद्राने सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. एखाद्या राज्यात आपल्या विचारांचे राज्य नाही म्हणून अडवणूक करणे हे लोकशाही संकेतास धरून नसते. इंदिरा गांधींची राजवट असताना बहुसंख्य राज्यांत काँगेसचीच सरकारे होती, पण सुवर्णकाळ काही आला नाही. ‘गरिबी हटाव’चा त्यांचा नारा लोकप्रिय ठरला. पण गरिबी काही हटली नाही. मोदी यांनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती आणि दुसऱ्या स्वातंत्र्याचा नारा दिला. तो फक्त दोन वर्षांत विरून गेला. व्ही. पी. सिंग हे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे महामेरूच ठरले होते. आपापल्या युगात त्यांनी सुवर्णकाळ आणण्याची धडपड केलीच होती. 
 
- जनता पक्षाच्या काळातही अनेक मोठय़ा राज्यांत काँगेसचा दारुण पराभव झाला, पण राज्यातील जनतेला अपेक्षित सुख व स्थैर्य लाभले नाही. कारण फक्त सत्तास्थापना हेच त्यांचे एकमेव ध्येय ठरले व जनता या ध्येयपथावरील फक्त पायपुसणे ठरत गेली. लोकशाहीत आजही जनतेच्या नशिबी पायपुसण्याचीच भूमिका येणार असेल तर सुवर्णकाळाचे स्वप्न मोडून पडेल. दुसरे असे की, सर्वच राज्यांत भाजपचेच राज्य हवे हा संकल्प चांगला व प्रेरणादायी आहे. मग राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ज्या ३३ पक्षांना ‘ताट व पाट’ दिले त्या पक्षांबाबत तुमचे धोरण काय? याच सर्व मित्रांच्या मदतीने आजचे सुवर्णयुग अवतरले आहे. शिवसेना, अकाली दल, तेलुगू देसमसारखे पक्ष आपापल्या राज्यात ताकदीने उभे आहेत. सत्तेत असो अगर नसो, शिवसेनेचा सुवर्णकाळ कधीच संपत नाही. सुवर्णकाळाच्या वाटचालीत मित्रांची साथ हवी आहे का यावरही एकदा स्पष्ट विवेचन व्हावे. सुवर्णकाळाचे निर्माते व साक्षीदार हे काळानुसार बदलत असतात, असे देशाचा इतिहास सांगतो.