उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी; भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 04:38 PM2022-01-14T16:38:46+5:302022-01-14T17:12:25+5:30

मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते गेले ७० दिवस कोणालाही उपलब्ध नाहीत असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

Uddhav Thackeray should hand over the responsibility of CM post to another; BJP Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी; भाजपाची मागणी

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी; भाजपाची मागणी

Next

मुंबई - राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. कोरोनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी अन्य नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली पाहिजे अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा असं त्यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्रातील परिस्थिती देशात चांगली आहे असा दावा करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊतांना चंद्रकांत पाटलांनी चिमटा काढला. मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते गेले ७० दिवस कोणालाही उपलब्ध नाहीत. एसटीचा संप चालू असून ७० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारी भरतीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत. निराशेमुळे तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही. त्यांना विमा मिळत नाही आणि नुकसानभरपाईही मिळत नाही. असे असूनही महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे असे संजय राऊत यांना वाटत असेल तर ठीक आहे असं टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.

दरम्यान, नशिबाने काल परवा प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या संजय राऊतांसारख्या नेत्याने आपल्या दृष्टीची चिंता करू नये. ती तपासायला भाजपाचे नेतृत्व समर्थ आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चेअरमनपद मिळवले पण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कसा पडला हे त्या पक्षाला समजत नाही. तुम्हाला पूर्णपणे संपविण्याचा डाव चालू असून त्यात तुम्ही फसत चालला आहात. त्याची आधी चिंता करा, असा टोला पाटलांनी हाणला

Web Title: Uddhav Thackeray should hand over the responsibility of CM post to another; BJP Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app