निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:36 IST2025-11-01T15:35:29+5:302025-11-01T15:36:38+5:30
Uddhav Thackeray, Raj Thackeray Satyacha Morcha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज मुंबईत मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज मुंबईत मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सक्षम नावाच्या अॅपवरून माझ्या नावाने खोट्या नंबरवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज केला गेला होता. व्हेरिफिकेशनसाठी हा अर्ज केला होता. माझ्यासह माझ्या कुटुंबाची चारही नावे मतदार यादीतून वगळण्याचा हा डाव असल्याचा मला संशय आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांनी पुरावेच दिले आहेत. आपला पक्ष चोरला, नाव चोरले, वडील चोरायचा प्रयत्न केला. आता हेही कमी नाही म्हणून मतदार चोरी करायचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी मतदारयादीतील नावे तपासा. मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, काय तो पर्दाफाश कराच. मुख्यमंत्र्यांनीही मान्य केले, की मतचोरी होतेच आहे, असे ठाकरे म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे अधिकारी मातोश्रीवर आले होते. मला विचारतात की, हा नंबर तुमचा आहे का, मी खोटा असल्याचे त्यांना सांगितले. यावर ते तुम्हाला अजून काही सांगायचे आहे का असे त्यांनी विचारले. मी म्हणालो तुम्ही आलात माझ्याकडे, मला काय ते सांगा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्हालाही निवडणुका हव्या आहेत. आम्ही यांना लोकशाहीच्या मार्गाने ठोकण्यासाठी आसुसलेले आहोत. प्रामाणिकपणे आम्ही सर्व मार्ग अवलंबत आहोत. न्यायालयात तरी न्याय मिळतो की नाही याची परीक्षा होणार आहे. मतचोर दिसेल, तिथे त्यांना फटकवा. परत सांगतो, आज ही सगळी एकजूट झालेली आहे. अॅनाकोंडा बसलेला आहे. जशी निवडणूक येईल, तशी दडपशाही सुरू होईल. हे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणूक आयोग लाचार झालेला आहे. शिवसेनेची केस सर्वोच्च न्यायालयात सुरुच आहे, तुमच्या मनगटात ताकद आहे. आम्ही तुमच्यासाठी एकत्र आलो आहोत. दोन भाऊ एकत्र आले, आता झाले असे वाटून घेऊ नका. महाराष्ट्राने आवळलेली मूठ असलेला फोटो मतचोरांना पाठवा, असे ठाकरे म्हणाले.